धाराशिव (प्रतिनिधी)- येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 15 ऑगस्ट  स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्वप्रथम सकाळी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त अशोकभाऊ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने  तसेच सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर हरघर तिरंगा या अभियानाअंतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये करण्यात आले. या रॅलीमध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. देशभक्तीने भारावलेल्या रॅलीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वज हातामध्ये घेतला होता.

यावेळी झालेल्या विविध कार्यक्रमांमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.  यावेळी बोलताना संस्थेचे विश्वस्त अशोकभाऊ शिंदे म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक हुतात्म्यानी देशासाठी बलिदान दिले असून या बलिदानाचे आपण सर्वांनी आजच्या या पवित्र दिवशी स्मरण केले पाहिजे. हर घर तिरंगा या अभियानामुळे  देशाप्रती आपल्या सर्वांच्या मनामध्ये ज्या भावना आहेत ते व्यक्त करण्याचाच हा दिवस. असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की “हर घर तिरंगा “ या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. महाविद्यालयामध्ये बहुतेक वेळा रॅली नसते पण या अभियानाअंतर्गत रॅली काढल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चैतन्यमय वातावरण पसरले. प्रत्येक विद्यार्थ्याने देशाप्रती काहीतरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यावेळी विविध झालेल्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 
Top