धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापुर तालुक्यातील मंगरुळ येथील मांजरा शुगर (कंचेश्वर ) इंडस्ट्रीज प्रा.लि, कारखाना सहकार महर्षी व महाराष्ट्राचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे वाटचाल करत आहे. कारखान्याने कार्यक्षेत्रातील तसेच आसपासच्या भागातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता कारखाना व्यवस्थापनाने ऊस विकास योजना राबविण्याचे धोरण ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणुन दि.16 ऑगस्ट रोजी कारखान्यामार्फत तालुक्यातील मौजे काडगांव येथे ऊस विकास योजनेअंतर्गत “ आधुनिक ऊस लागवड तंत्रज्ञान“ या विषयावरती शेतकरी मेळावा घेण्यात आला. सदर मेळाव्या प्रसंगी उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांना वसंतदादा शुगर इन्स्टियुटचे माजी शास्त्रज्ञ डॉ. सुरेश माने पाटील यांनी मार्गदर्शन केले.
राज्यात ऊस हे नगदी पिक असुन ते घटत आहे. उत्पादकता ही प्रमुख उत्पादकांपुढील समस्या आहे. तर दुसरीकडे एकरी 100 टन किंवा त्यापेक्षा जास्त उत्पादन घेणारे अनेक शेतकरी आहेत. योग्य हंगामात ऊस लागवड, आंतरपिके लागवडीच्या सुधारीत पध्दती, जमिनीची सुपीकता, योग्य पध्दतीने पुर्व मशागती, खतांचा एकात्मिक वापर, चांगल्या बेण्याची निवड, रोग व तणाचे योग्य व्यवस्थापन, आधुनीक ऊस लागवड तंत्रज्ञानाचा वापर केल्यास एकरी ऊस उत्पादनात वाढ होत असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट, पुणे यांचे माजी शास्त्रज्ञ डॉ. माने पाटील यांनी शुक्रवार (ता. 16) कार्यक्षेत्रातील काडगांव या गावामध्ये शेतकरी मेळयात केले. कारखान्याने दि. 16 ते 19 ऑगस्ट चे दरम्यान प्रत्येक दिवशी सकाळी व सायंकाळी या सत्रात शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्याची सुरुवात दि. 16 ऑगस्ट रोजी करण्यात आली. कारखान्याने आखलेल्या ऊस विकास कार्यक्रम व शेतकरी मेळाव्यास मोठया उत्साहाने शेतकरी बांधवांनी उत्कृष्ठ प्रतिसाद दिला.
सदर शेतकरी मेळाव्या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक माजी शास्त्रज्ञ डॉ. सुरेश माने पाटील, काडगावचे सरपंच अशोक माळी, तंटामुक्त अध्यक्ष सतीश गिराम, माजी जिल्हा परिषद सदस्य चांनावर, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बब्रुवान शिंदे, पोलीस पाटील साधु माळी, कारखान्याचे जनरल मॅनेजर सतीश वाकडे, जनरल मॅनेजर (टेक्नी.) अजीत कदम, मुख्य शेतकी अधिकारी नारायण धांडे, ऊस विकास अधिकारी शशिकांत बुलबुले, ऊस पुरवठा अधिकारी पदमाकर लोमटे, सर्व विभागप्रमुख, गटप्रमुख व मोठया संख्येन शेतकरी उपस्थित होते.