धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्याचे सुपूत्र आनंद बब्रुवान जाधव यांना नक्षलग्रस्त भागात केलेल्या सेवेबद्दल त्यांना विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. जाधव हे सध्या बीड जिल्ह्यातील शिरसाळा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
गडचिरोली येथे तीन वर्षे पोलीस दलात कार्यरत असताना पोलीस उपनिरीक्षक आनंद बब्रुवान जाधव यांनी विविध उपक्रमासाठी परिश्रम घेतले होते. त्यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या या सेवेबद्दल पोलीस महासंचालक कार्यालयाने 12 ऑगस्ट रोजी त्यांना विशेष सेवा पदक घोषित केले आहे. पोलीस उपनिरीक्षक आनंद जाधव हे तुळजापूर तालुक्यातील बोरगाव येथील रहिवाशी आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.