धाराशिव (प्रतिनिधी)- विरोधकांनी अपप्रचार करुन जनतेत संभ्रम निर्माण केल्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासह मराठवाड्यात भारतीय जनता पार्टीला अपेक्षित यश मिळाले नाही. हा जनादेश आपण स्वीकारला पाहिजे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांना चारीमुंड्या चीत करण्यासाठी आता मोठ्या ताकदीने कामाला लागावे, असे आवाहन माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी केले.
धाराशिव येथे भाजपाचे जिल्हास्तरीय अधिवेशन व विस्तारित कार्यकारिणीची बैठक बुधवारी (दि.14) स्वास्तिक मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष संताजीराव चालुक्य पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या अधिवेशन व विस्तारित कार्यकारिणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी राज्यमंत्री तथा तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, मा.आ. सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष संताजीराव चालुक्य पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. मिलिंद पाटील, ॲड. अनिल काळे, ॲड. खंडेराव चौरे, ॲड. व्यंकटराव गुंड, भाजपाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन काळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, नेताजी पाटील, अस्मिता कांबळे, माजी उपाध्यक्ष सुधाकरराव गुंड, ज्येष्ठ नेते कोंडाप्पा कोरे, सुरेश देशमुख, माजी नगराध्यक्ष मधुकर तावडे, संपतराव डोके, मिलिंद पांगरकर, राहुल पाटील सास्तूरकर, प्रभाकर मुळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना दानवे पाटील म्हणाले की, भारतीय जनता पार्टीला जिंकवायची ताकद कार्यकर्त्यांमध्ये आहे. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सत्ता आमचीच असल्याच्या अविर्भावात आहे. आता भाजपा कार्यकर्त्याच्या मनात आणखी ताकद लावली असती तर यश मिळाले असते अशी भावना आहे. आतापर्यंत अनेक यश-अपयश पाहिलेली भारतीय जनता पार्टी आहे. एक गावचा सरपंच ते पंचायत समिती सदस्य, सभापती, आमदार, राज्यात आणि केंद्रात मंत्री असा माझा प्रवास केवळ भारतीय जनता पार्टीमुळेच झाला. भारतीय जनता पार्टीच सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देते. म्हणून कार्यकर्त्यांनी स्वयंप्रकाशित होऊन भारतीय जनता पार्टीच्या सरकारचे कार्य जनतेपर्यंत पोहचविले पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे.
महायुती सरकारने लाडकी बहीण योजना राज्यात लागू केल्यानंतर विरोधक पैसे कुठून आणणार? असा सवाल करत आहेत. आम्ही लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये महिन्याला देणार आहोत. त्याची तरतूद केलेली आहे. पण तुम्ही सत्तेत नसताना खटाखट खटाखट साडेआठ हजार रुपये कुठून देणार होतात? असा खडा सवालही यावेळी दानवे पाटील यांनी केला. पंडित नेहरु यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा देशाच्या प्रधानमंत्रीपदाचा बहुमान भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे हेच आपले यश असल्याचे त्यांनी नमूद केले.
धाराशिवची जागा भाजपाच्या वाट्याला
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा मतदारसंघाची जागा आपलीच आहे. आता धाराशिव विधानसभा मतदारसंघाची जागा आपल्याला मिळवायची असेल तर मोठी ताकद लावावी लागेल. ताकद असल्याशिवाय हे होणार नाही. त्याकरिता जिल्हा, तालुका स्तरावर बैठक घेऊन ही जागा आपल्याकडे घेऊ. विधानसभा निवडणुकीत महायुतीचेच सरकार येणार आहे. त्यामुळे विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराला कार्यकर्त्यांनी ताकद द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
धाराशिवच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावले - सुजितसिंह ठाकूर
माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने आमदारकीची संधी दिली. प्रदेश सरचिटणीस पदावरही काम केले. या काळात धाराशिव जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतत पाठपुरावा केला. हे प्रश्न मार्गी लावण्यात रावसाहेब दानवे पाटील यांचा मोठा वाटा आहे. धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्ग, मेडिकल कॉलेज, 25 वर्षापासून रखडलेल्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला पुनरुज्जीवन देण्याचे श्रेय भारतीय जनता पार्टीलाच आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजना जनतेपर्यंत पोहचवाव्यात, असे आवाहन माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केले.
जिल्ह्याला भरघोस निधी मिळवून आणला - आ.राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी भरघोस निधी मिळवून आणण्याचा प्रयत्न महायुती सरकारच्या काळात केला. त्यात मोठे यश मिळाले आहे. धाराशिव-तुळजापूर रेल्वे मार्गाचे काम सप्टेंबर महिन्यात सुरु होऊन तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेमार्गावर येईल. टेक्निकल टेक्स्टाईल पार्कचा विषयही मार्गी लागला आहे. त्याचबरोबर तामलवाडी, वाशी, होर्टी येथील एमआयडीसी प्रकल्पही लवकरच सुरु होतील. पर्यटनाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे. मराठवाड्यातील वर्ग 2 मध्ये घेतलेल्या जमिनी पुन्हा वर्ग 1 मध्ये घेण्याच्या महायुती सरकारने घेतल्याच्या निर्णयाचे त्यांनी यावेळी स्वागत केले.
धाराशिवची जागा भाजपला घेण्याचा एकमुखी ठराव
धाराशिव विधानसभा मतदारसंघाची जागा भारतीय जनता पार्टीला घेण्याचा एकमुखी ठराव या अधिवेशनात घेण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा मतदार संघाची जागा भारतीय जनता पार्टीकडे असून तेथे राणाजगजितसिंह पाटील हे विद्यमान आमदार आहेत. धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघातही भारतीय जनता पार्टीचे मोठे कार्य आणि प्राबल्य असल्यामुळे आणखी एक जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी यासाठी या अधिवेशनात माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत हा ठराव घेण्यात आला. त्यामुळे धाराशिव व कळंब तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. टाळ्यांच्या कडकडाटात या ठरावाचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केेले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पंडित दीनदयाळ उपाध्याय, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन विस्तारित कार्यकारिणी बैठक व जिल्हास्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संताजीराव चालुक्य पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विकास कुलकर्णी तर आभारप्रदर्शन बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. अधिवेशनास भाजपा नेते सतीश दंडनाईक, इंद्रजित देवकते, प्रवीण पाठक, प्रदीप शिंदे, युवराज नळे, पांडुरंग लाटे, शिवाजीराव गवळी, रोहित देशमुख, ॲड.दीपक आलुरे, अभय इंगळे, उदय देशमुख, गणेश इंगळगी, सुनील पंगुडवाले, महिला मोर्चाच्या नंदाताई पुनगडे, मीना सोमाजी यांच्यासह धाराशिव, तुळजापूर, कळंब, वाशी, भूम, परंडा, उमरगा, लोहारा तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.