धाराशिव (प्रतिनिधी) - बदलापूर येथील बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी राज्यातील निक्कमी, असंवेदनशील व निर्ढावलेल्या महायुती सरकारला जाग आणण्यासाठी उद्या दि.24 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सर्व पक्ष्यांमधील संवेदनशील मुली, महिला व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार कैलास पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड धीरज पाटील व राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दि.23 ऑगस्ट रोजी केले.

धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, शिवसेना शहर प्रमुख सोमनाथ गुरव, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, धाराशिव तालुकाध्यक्ष विनोद वीर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आ. पाटील म्हणाले की, बदलापूर प्रकरणी राज्यातील महायुती सरकार पूर्णतः अपयशी ठरलेले आहे. आपल्या लेकी, आई, बहिणीसाठी व त्या निर्ढावलेल्या सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी होऊन सत्तेची मस्ती चढलेल्या सरकारला जागे करणे आवश्यक आहे. तसेच या बंदमध्ये सहभागी होऊन व्यापारी व नागरिकांनी सरकारला धडा शिकविला तर हे सरकार निश्चित जागेवर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर ॲड धीरज पाटील म्हणाले की, बदलापूर प्रकरणी राज्य सरकार अपयशी ठरले असल्यामुळे व्यापारी, नागरिक व सर्व शैक्षणिक संस्थांनी बंद पाळून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच संजय पाटील दुधगावकर म्हणाले की, राज्यातील लहान मुलींपासून युवती, महिला असुरक्षित आहेत, हे मागील 10-12 दिवसांपासून सर्वांनी बघितलेले आहे. त्यामुळे संवेदना असलेल्या नागरिक, व्यापारी व महिला यांनी कोणताही पक्ष मध्ये न आणता व या निक्कमी, असंवेदनशील व निर्ढावलेल्या सरकारला धडा शिकवण्यासाठी तसेच वठणीवर आणण्यासाठी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.


 
Top