धाराशिव  (प्रतिनिधी) - जीर्ण पाईपलाईन आणि अपुर्‍या वितरण व्यवस्थेमुळेच नळदुर्ग शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न अधिक बिकट होऊन बसला होता. शहरवासीयांचा हा संघर्ष आता कायमचा निकाली निघणार आहे. यापुढे शहराला दररोज पाणी मिळेल, असा शब्द मी देतो आणि जे सांगतोय ते करून दाखवणारच, असा दावा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नवीन पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी केला.

नळदुर्ग येथे मंगळवारी शहराच्या अमृत 2.0 योजनेअंतर्गत मंजूर नवीन पाणी पुरवठ्याच्या विविध कामांचे भूमिपूजन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. भविष्यातील 30 वर्षांची गरज लक्षात घेवून नळदुर्ग शहराच्या पाणीपुरवठ्याची आखणी करण्यात आली आहे. त्याअंतर्गत सात जलकुंभ, जलशुध्दीकरण केंद्र, पंपहाऊस आणि जवळपास 57 किलोमीटर अंतराची पाणी पुरवठा व्यवस्थेचे काम हाती घेण्यात आले आहे. धरण उशाला, कोरड घशाला अशी नळदुर्गवासीयांची अवस्था होती. त्यावर प्रभावी तोडगा काढत शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून 43 कोटी 67 लाख रूपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आहे. त्यामुळे शहरवासीयांना दररोज पाणी मिळणार आहे. पुढील टप्प्यात नळाद्वारे 24 तास पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी बोलताना सांगितले.

महायुती सरकारच्या माध्यमातून शहर विकासाकरिता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नळदुर्ग एक ऐतिहासिक वारसा असलेले पर्यटनस्थळ आहे. त्यादृष्टीनेही शहर विकासाचा प्रयत्न सुरू आहे. नळदुर्ग भुईकोट किल्ल्याला दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. त्याअनुषंगानेच शहरात महात्मा बसवेश्वर स्मारक (बसवसृष्टी), वसंतराव नाईक यांचे स्मारक, मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यातील शहिद बचित्तरसिंग यांच्या स्मारकाचेही काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी निधीची उपलब्धता देखील झाली असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. शहरातील रस्त्यांकरिता 95 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असून दोन कोटी रूपये खर्चून शहरात मोठा शादीखाना बांधण्यात येत आहे. गोरगरीब कुटुंबांना त्याचा मोठा लाभ होणार आहे. वर्ग-2 जमिनीचा महत्वपूर्ण प्रश्न महायुती सरकारने निकाली काढल्यामुळे शहरातील एक हजार 64 एकर जमीन वर्ग-1 मध्ये येणार आहे. होर्टी येथे 250 एकर जमिनीवर एमआयडीसी उभारली जाणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या जमिनीचा कंटूर सर्व्हे केला आहे. शहरानजीक देखील नवीन एमआयडीसीसाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे आमदार पाटील म्हणाले.

अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला कबाल्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. सुमारे हजार कुुटुंबियांना कबाले वाटप केले जाणार आहेत. प्रातिनिधीक स्वरूपात या कार्यक्रमात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते पाच नागरिकांना कबाल्याचे वाटप करण्यात आले. तसेच व्यायामशाळेसाठी 25 लाख रूपये आणि वडार समाजाच्या सभामंडपासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतही आमदार पाटील यांनी आश्वासित केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष नय्यर जहागिरदार, भाजपा नेते सुशांत भूमकर, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश सोनटक्के, माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक आलुरे, माजी नगरसेवक संजय बताले, भाजपा शहराध्यक्ष धिमाजी घुगे, रणजितसिंह ठाकूर, भाजपाचे माजी शहराध्यक्ष पदमाकर घोडके, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सचिव श्रमिक पोतदार, माजी नगरसेवक निरंजन राठोड, कैलास चव्हाण, माजी नगरसेविका झमाताई राठोड, माजी नगरसेवक विनायक अहंकारी, माजी नगरसेवक बसवराज धरणे, सुनिल बनसोडे, गौस शेख, रियाज शेख, एस.के.बागवान, अक्षय भोई, बबन चौधरी, गणेश मोरडे, बंडोपंत पुदाले, सागर हजारी आदी उपस्थित होते.


लवकरच अप्पर तहसीलची गोड बातमी

अनेक वर्षांपासून नळदुर्ग शहर व परिसरातील 40 गावांसाठी अप्पर तहसील कार्यालयाची मागणी केली जात आहे. लवकरच अप्पर तहसील कार्यालयाची गोड बातमी देऊ, असेही आमदार पाटील यांनी या कार्यक्रमात सांगितले. आजवर शहराच्या इतिहासात कधी नव्हे, एवढा 154 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पर्यटनवृध्दी, तरूणांना रोजगार, यासाठी नियोजनबध्द प्रयत्न सुरू आहेत. नळदुर्ग शहरासाठी जे जे चांगले करता येईल, ते करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असल्याचेही आमदार पाटील यांनी नमुद केले.


 
Top