तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी देविजींच्या श्रमनिद्रा पर्वासाठी नगरचे पलंगाचे मानकारी पलंगे (तेली) घराण्याकडून हळद देण्यात येते. श्रावण महिन्याच्या अंतिम आठवड्यात श्री तुळजाभवानी देविजींच्या पलंगोत्सव सोहळ्याची चाहूल लागते. काही दिवसातच या पलंगोत्सव सोहळ्याला सुरूवात होईल.
घोडेगाव-जुन्नर-अहमदनगर-तुळजापूर असा पलंगाचा पायी प्रवास असतो. पलंग दसऱ्याच्या आदल्या दिवशी तुळजापूरमध्ये पोहचतो आणि दसऱ्याला श्री तुळजाभवानी माता सिमोल्लंघन खेळून या लाकडी पलंगावर निद्रिस्त होते. कोजागिरी पौर्णिमेला देवी पुन्हा श्रमनिद्रा संपवून सिंहासनावर विराजमान होते. ज्यावेळीदेवी पलंगावरून सिंहासनावर विराजमान होणार असते. त्यावेळी देवीच्या संपूर्ण मुर्तीला हळद लावली जाते. ही हळद अहमदनगर येथील श्री तुळजापूर देवी मंदिराचे पुजारी आणि तुळजाभवानी लाकडी पलंगाचे मानकरी पलंगे (तेली) कुटुंबातील सुवासनी, कुमारींकडून दरवर्षी श्रावण महिन्यात जात्यावर देविजींच्या महिमेची गाणी गात दळण्यात येते. तुळजापूर मंदिरातील खंडोबा मंदिर परिसरातील उपदेवता, श्री खंडेरायाचे पुजारी वाघे मंडळी यांच्याकडे भंडारा (हळद) सपूर्द करतात. नंतर ती हळद वाडग्यात घेवून देविजींच्या मुर्तीस लावतात. मग देवीची मुर्ती पलंगावरून उचलून सिंहासनावर विराजमान होण्यासाठी जाते.