तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास केंद्रीय शिक्षा माध्यमिक बोर्ड, नवी दिल्ली यांनी अभ्यासक्रम चालू करण्यास परवानगी दिली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी विशेष प्रयत्न केले होते.

महाराष्ट्रातील सैनिकी विद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थी सैन्य दलात दाखल व्हावेत व देशसेवा करावी. या उददेशाने सन 1996 पासून सैनिकी शाळा सुरु झाल्या. तेंव्हा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान या संस्थेस महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा सुरु करण्याचा मान मिळाला होता. परंतु सदरील सैनिकी शाळामध्ये राज्य शासनाचा अभ्यासक्रम चालू असल्याने सैन्य दलामध्ये समाविष्ट होण्याचे प्रमाण कमी असल्याने  डॉ. सचिन ओम्बासे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात सीबीएससी अभ्यासक्रम चालू करण्याचा निर्णय घेतला. विद्यालयामार्फत सीबीएससी अभ्यासक्रम चालू करण्याकरीतेची प्रक्रिया सप्टेंबर 2023 पासून सुरु करण्यात आली. विद्यालयाने सर्व बाबींची पूर्तता केल्याने सीबीएससी बोर्डाकडुन दिनांक 19/08/2024 रोजी विद्यालयास मान्यता मिळाली आहे.

या प्रसंगी डॉ. सचिन ओम्बासे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांचे फेटा बांधुन पुस्तक देवुन विद्यालयाचे प्राचार्य वैजनाथ घोडके यांनी सत्कार केला. त्याचबरोबर अरविंद बोळंगे तहसिलदार तथा विश्वस्त, श्रीमती माया माने तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांचाही पुस्तक भेट देवुन सत्कार करण्यात आला. प्राध्यापक गणेश मोटे, श्रीनिवास कदम, ज्योती नाशे उपस्थित होते.

 
Top