धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना राज्य सरकार या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ सकल धाराशिवकरांच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. फाशी द्या फाशी द्या.. बलात्काऱ्यांना फाशी द्या.. बालिकांना न्याय द्या.. आम्हाला न्याय हवाय.. गगनभेदी घोषणा देऊन विद्यार्थिनींनी न्यायाच्या मागणीसाठी आक्रोश व्यक्त केला.
बदलापूर येथे लहान मुलींवर शाळेमध्ये झालेला लैंगिक अत्याचार, कोलकाता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करुन खून आणि छत्रपती संभाजीनगर येथे तरुणीची झालेली हत्या तसेच उरण, चाकूर, तुळजापूर व महाराष्ट्रात आणि देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेतील नराधमांना जलगदती न्यायालयात प्रकरण चालवून तात्काळ फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी सकल धाराशिवकर रस्त्यावर उतरले. छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर मोर्चा काढून घटनांचा निषेध करण्यात आला. या घटना महाराष्ट्राच्या आणि देशाच्या संस्कृतीला काळीमा फासणाऱ्या आहेत. असे दुष्कृत्य करणाऱ्या नराधमांना जगण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे अशा नराधमांविरुद्ध अतिजलद न्यायालयात चालवून फाशीची शिक्षा द्यावी आणि मयत व पीडित महिला व बालिकांना न्याय द्यावा. 31 डिसेंबर 2024 पूर्वी नराधमांना फाशीची शिक्षा न झाल्यास शासनाच्या लाडक्या बहिणी मयत बहिणींना न्याय मिळवून देण्यासाठी अन्न-पाणी त्याग उपोषण करतील, असे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले.
आंदोलनात सकल धाराशिवकर, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, महिला आघाडीच्या श्यामलताई वडणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.प्रतापसिंह पाटील, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर, मसूद शेख, श्वेता दुरुगकर, मोना भोसले, आनंदी पाटील, आदित्य पाटील, धीरज घुटे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सय्यद खलील, सरचिटणीस अशोक बनसोडे, तालुकाध्यक्ष विनोद वीर, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, उमेश राजेनिंबाळकर, अयुब पठाण, मुहिब शेख, सुनील बडूरकर, प्रभाकर लोंढे, अभिमान पेठे, कफिल सय्यद, स्वप्नील शिंगाडे, सकल मराठा समाजचे बलराज रणदिवे, निखिल जगताप, तेजस बोबडे, जयवंत ओमणे, सुरज लोंढे, शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे जिल्हाध्यक्ष गौरव बागल, जिल्हा उपाध्यक्ष आकाश कोकाटे, मंगेश निंबाळकर, आकाश भोसले, श्योगेश आतकरे, अमोल सिरसट, दत्तात्रय जावळे, हनुमंत तांबे, गुंडोपंत जोशी ॲड.संजय शिंदे, भैरवनाथ रणखांब, अविनाश रणखांब, अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळुंके, शिवहरी भोसले, धनंजय दुधभाते, प्रणव जाधव, स्वप्नील डिसले, रामहरी कस्पटे, आशा देशपांडे, डॉ.इंदु राठोड, साक्षी मस्के, अंकिता काकडे, गौरी मस्के, विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. प्रसाद जोशी, ॲड.रवींद्र कदम, ॲड.नितीन भोसले, ॲड.धैर्यशील सस्ते, ॲड.घनश्याम रितापुरे, ॲड.अशोक सोन्ने, ॲड.किरण चादरे, ॲड.अजय पाटील, ॲड.बी.बी. देशमुख, ॲड. मंगेश गायकवाड, ॲड.आर.एस. मुंडे, ॲड.भाग्यश्री रणखांब, ॲड.श्रीदेवी मुसळे-बळे, ॲड.विशाखा माळी-डोके, ॲड.ज्योती बडेकर, ॲड.भाग्यश्री कदम,ॲड.आशा गोसावी, ॲड.विजया भोसले, ॲड.सारिका पाटील, ॲड.प्रियांका शहाणे ॲड.प्रणिता मुळे, ॲड.विद्या साखरे यांच्यासह विविध पक्ष, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तसेच धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी हायस्कुल, अभिनव इंग्लिश स्कूलसह विविध शाळांमधील विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
..तर आम्ही कायद्याची वाट बघणार नाही - सलगर
भारत देश संविधानावर चालतो, परंतु ही परिस्थिती बदलली आहे. आम्हाला सरकारची 1500 रुपयांची अगरबत्ती नकोय, आम्हाला स्वाभिमानाने जगणारी महिला, युवती बालिका हवीय. म्हणून महाराष्ट्रात अशी घटना घडली तर आम्ही कुठल्याही कायद्याची वाट बघणार नाही. रस्त्यावर पळवून नराधमांना आम्ही नराधमांना शिक्षा देऊ, असा इशारा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांनी यावेळी दिला.
नराधमांना फाशीच झाली पाहिजे-वडणे
या सरकारला सत्तेवरुन खाली खेचण्याची गरज आहे. ज्यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडली त्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. त्यामुळे नराधम असे कृत्य करत आहेत. अशा नराधमांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी. या राज्याच्या गृहमंत्र्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी श्यामलताई वडणे यांनी यावेळी केली.
सरकारने तात्काळ कारवाई करावी-विद्यार्थिनी
बदलापूर, कोलकाता किंवा इतर ठिकाणी घडलेल्या महिला, मुलींवरील अत्याचाराची घटना एखाद्या अधिकारी, मंत्र्याच्या मुलीसोबत घडली असती तर सरकारने कठोर पावले उचलली असती. या देशात आणि राज्यांत सर्वसामान्यांना न्याय मिळणार नाही का? एवढ्या घटना घडत असताना आरोपींवर कठोर कारवाई होत नाही. त्यामुळे मुली घराबाहेर पडणारच नाही. म्हणजे महिला, मुलींनी घरातच बसावे असे सरकारला वाटतेय का? असा परखड सवाल करत सरकारने या प्रकरणांत कठोर कारवाई करावी, अशी मागणी मोर्चात सहभागी अभिनव इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनीने केली.
देशात महिला असुरक्षित-ॲड.भाग्यश्री कदम
देशात, राज्यांमध्ये आज महिला असुरक्षित आहेत. त्यांच्यावर अमानुष अत्याचार होत आहेत. महिला, मुली सुरक्षित नसतील तर यापुढे महिलांकडूनच नराधमांना प्रत्युत्तर नक्की मिळेल. म्हणून सरकारने वेळीच विचार करावा. स्वतंत्र भारतामध्ये महिलांवर अमानुष अत्याचार करुन खून केला जात असेल तर याचे उत्तर सरकारने द्यावे. प्रत्येक नागरिक हा देशाचा नागरिक आहे, हे ओळखून राजकारण बाजुला ठेवून जनजागृती करणे ही काळाची गरज आहे, तरच या देशात रामराज्य आहे असे म्हणता येईल, असे मत विधिज्ञ मंडळाच्या ॲड.भाग्यश्री कदम यांनी व्यक्त केले.
बडबडगीताऐवजी गुड टच बॅड टच शिकविण्याची वेळ-दुरुगकर
ज्या वयात बालिकांना बडबडगीते शिकविली जातात, त्या वयात आता गुड टच बॅड टच शिकविण्याची वेळ आली आहे. शाळेत लहान मुलांना प्रश्न विचारुन मुलाखत घेतली जाते. तसे शाळेतील कर्मचाऱ्यांची मुलाखत का घेतली जात नाही? राज्यातील सरकारने याचा वेळीच विचार करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाच्या गुंड प्रवृत्तीच्या पदाधिकाऱ्यांना सरकारने वेळीच आवर घालावा. तरच महिला मुली सुरक्षित राहतील असे श्वेता दुरुगकर यांनी सरकारला ठणकावले.