धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये जिल्हा प्रशासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या 125% पीक कर्ज वाटप करून जिल्ह्यामध्ये पीक कर्ज वाटपात प्रमुख स्थान मिळवले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या या कामाबद्दल जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे तसेच सर्व लोकप्रतिनिधी यांनी कौतुक केले आहे.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेला चालू आर्थिक वर्षात 275.30 कोटी रुपयांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने 33528 शेतकऱ्यांना 344.00कोटी पीक कर्ज वाटप करून खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मदतीचा हात दिलेला आहे. बँकेच्या वतीने थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी व्याजात सवलत असलेल्या आकर्षक अश्या महाग्रामीण किसान सन्मान योजना तसेच महाग्रामीण अन्नदाता सहयोग योजना राबवल्या जात आहेत. बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड आणि मुख्य सरव्यवस्थापक श्री दत्तात्रय कावेरी यांनी शेतकऱ्यांना या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले आहे.

महाराष्ट्र ग्रामीण बँक धाराशीव जिल्ह्यातील 37 शाखांच्या माध्यमातून प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्या कर्ज योजना, महिला बचत गट कर्ज वाटप, कृषि विभागाच्या विविध शासकीय योजना, जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग व विविध शासकीय महामंडळे यांच्या वैयक्तिक कर्ज योजना तसेच समूह कर्ज योजना राबवून तसेच दैनंदिन बँकिंग व्यवहाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी जोडली गेलेली आहे. खरीप हंगामामध्ये योग्य वेळी बँकेने पीक कर्ज देऊन तसेच पीक कर्जाचे विक्रमी वेळेत नूतनीकरण केल्याने सर्व शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री अविनाश कामतकर तसेच धाराशीव जिल्हा समन्वयक श्री प्रशांत कुलकर्णी यांनी उर्वरित शेतकऱ्यांना लवकरात लवकर आपल्या शाखेशी संपर्क करून आपले थकीत कर्ज आकर्षक व्याज सवलत योजनेचा फायदा घेऊन नूतनीकरण करून घेण्याचे यावेळी आवाहन केले.


 
Top