तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील अपसिंगा परिसरातील सरदारा तलाव तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी व शिवअल्पसंख्याक आघाडी यांनी जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, धाराशिव यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मौजे. अपसिंगा ता. तुळजापूर येथील सरदारा तलाव नादुरुस्त असुन यात पावसाळ्यामध्ये पाणी साचत नाही. यामुळे परिसरातील
नागरीकांना व जनावरांना उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी भटकंती करावी लागते. तरी सदरील तलाव दुरुस्त करणे बाबत दि. 02/03/2020 रोजी तहसिलदार तुळजापूर यांचेमार्फत व आपल्या कार्यालयाकडे पत्र देवुन तलाव दुरुस्त करणे बाबत विनंती केली होती. काही दिवसांनी सन 2020 रोजी आपल्या कार्यालयाचे अधिकारी आदटराव यांनी भेट दिली होती. परंतु आजपर्यंत आपल्या कार्यालयामार्फत सरदारा तलाव दुरुस्त करणे बाबत कोणतेही उपाय योजना करण्यात आलेली नाही. परंतु सध्या अपसिंगा व परिसरामध्ये चालु वर्षांच्या जुन-जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असुन अपसिंगा येथील कावलदरा तलाव व चिंचखोरी तलाव हे दोन्ही तलाव 100 टक्के भरले आहेत. सरदारा तलाव नादुरुस्त असल्याने त्या तलावात फक्त 2 ते 4 टक्केच इतकाच पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. सन 2020 पासुन पाठपुरावा सुरु असतानासुध्दा आपल्या कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे सदरील तलावाच्या कामाची दुरुस्ती झाली नाही.
यामुळे यावर्षी तलावात पाणी जमा होवु शकले नाही. यामुळेच उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना व जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. या पत्राव्दारे आपणांस विनंती करण्यात येते की तात्काळ तलावाची पाहणी करुन तलाव दुरुस्त करणे बाबत योग्य त्या उपाय योजना करण्यात याव्यात. असे अमीर शेख, महेश पवार, बाळु निंबाळकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.