भूम (प्रतिनिधी)- जिल्ह्यात वितरित होत असलेल्या शालेय पोषण आहार अपहाराची सखोल चौकशीची मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या धाराशिव शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. शालेय पोषण आहाराच्या नियंत्रणासाठी 5 सदस्यीय समिती गठीत करावी. तसेच अपहार करणाऱ्या ठेकेदारावर कडक कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे. हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 

निवेदनात म्हटले आहे कि , महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्राथमिक व माध्यमिक शाळांतील इ 1 ली ते इ 8 वी पर्यन्तच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार वितरित केला जातो. या मध्ये प्रत्येक शाळेला विद्यार्थी संख्येनुसार तांदूळ वितरित केला जातो. मात्र जो ठेकेदार शाळांवर तांदूळ वितरित करतो तो ठेकेदार शिलाई असणाऱ्या पोत्यातील तांदूळ काढून घेतो. या 50 किलोच्या गोणीमध्ये 10, 12, 15 किलो तांदूळ कमी आढळून येतो. भूम तालुक्यातील चिंचोली येथील न्यू हायस्कुल येथे तीन गोण्या तांदूळ देण्यात आला. त्याचे वजन 50 किलो ऐवजी 41 , 43 व 45 किलो भरले. हा प्रकार मुख्याध्यापकांनी उघडकीस आणला. हा अतिशय गंभीर प्रकार आहे. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या राज्य सह संघटक मेधाताई कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अजित बागडे, उपाध्यक्ष प्रमोद कांबळे, संघटक शरद वडगावकर, कोषाध्यक्ष रवी पिसे, प्रसिद्धी प्रमुख आशिष बाबर यांच्यासह पदाधिकारी हजर होते.

 
Top