धाराशिव (प्रतिनिधी)-  यावर्षी सुरूवातीपासूनच चांगला पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यातच तेरणा धरण भरून ओसंडून वाहू लागल्याने धरण परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला आहे. त्यांचा हा आनंद आपल्यासाठी समाधानकारक व प्रेरणा देणारा आहे, अशी भावना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते तेरणा धरणाचे जलपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, तेरणा कालवा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून महायुती सरकारने त्यासाठी तीन कोटींचा निधी दिला आहे. डावा कालवा दुरुस्तीचे काम जवळपास 70 टक्के पूर्ण झाले आहे. रब्बी हंगामात या कालव्याद्वारे डिसेंबरमध्ये पहिल्या आवर्तनाचे पाणी सोडण्यासाठी आवश्यक ती सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तर उजव्या कालव्याच्या साफसफाईचे काम काही प्रमाणात झाले आहे. पावसामुळे कालव्यात पाणी असल्याने दुरुस्तीचे काम सध्या बंद असले तरी हे काम देखील लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. माजी मंत्री डॉ. पाटील यांच्या कामांमुळे सिंचन क्षेत्रात वाढ होवून जिल्ह्यात साखर कारखानदारी, गुळ पावडर कारखान्याची संख्या वाढली आहे.

यावेळी अनंतराव देशमुख, झुंबर बोडके, निहाल काझी, तानाजी गायकवाड, बाळासाहेब खांडेकर, नरहरी बडवे महाराज, गुणवंत देशमुख, नीलकंठ पाटील, ज्ञानेश्वर जंगाले,  दत्ताभाऊ तिवारी, बबलू मोमीन, रमेश भोसले, अमोल पाटील, नासेर शेख, एजाज काझी, विलास रसाळ, कुमार लोमटे, शिव सुरवसे यांच्यासह तेरणा धरण परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top