धाराशिव (प्रतिनिधी)- निजामकालीन जनगणनेत 38% कुणबी मराठा अशी नोंद असून देखील मराठवाड्यातील निजामशासित गावातील कुणबी नोंदीचे दस्तावेज उपलब्ध होत नसल्याने या भागातील नागरिकांमध्ये अन्यायाची भावना असून जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून कुणबी नोंदी शोधण्यासाठी हैद्राबादला पुनश्च समिती पाठविण्याचे ठरले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
धाराशिव तालुक्यातील वरुडा, सारोळा गावातील युवकांसह अनेकांकडून कुणबी नोंदी मिळत नसल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात येत आहे. ब्रिटीश व निजाम राजवटीतील गावांमध्ये कुणबी नोंदीबाबत मोठी तफावत आहे. निजाम राजवटीतील गावांमध्ये कुणबी नोंदीचे खूपच कमी दस्तावेज आजवर उपलब्ध आहेत. वरुडा गावापासून अगदी 2 कि.मी. अंतरावरील ब्रिटीश राजवटीतील उपळा गावामध्ये एक हजारहून अधिक कुणबी नोंदी आढळल्या आहेत. मात्र वरुडा गावातील केवळ एकच नोंद आजवर मिळाली आहे.
या अनुषंगाने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सूचने प्रमाणे मराठा समाजबांधवांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली व त्यांना पत्र देवून कुणबी नोंदीचे दस्तावेज शोधण्यासाठी पुनश्च समिती गठीत करून हैद्राबादला पाठविण्याची विनंती केली. या समितीमध्ये उप जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यासह मोडी व उर्दू लिपी जाणकार व स्थानिक युवकांचा समावेश करण्याची विनंती केली आहे. तसेच आई तुळजाभवानी मंदीर संस्थानचे महंत तुकोजी बुवा यांनी मंदिराबाबतच्या अनेक महत्त्वपूर्ण नोंदी तेथून प्राप्त केल्या असून त्यांना तेथील बारकावे माहित आहेत. त्यामुळे त्यांचाही समिती मध्ये समावेश करण्याचे सूचित केले आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी देखील याबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.
निवेदन देताना सुरेश देशमुख, दशरथ पाटील, प्रशांत पाटील, गणेश पाटील, अरविंद गाढवे, पृथ्वीराज मगर, बालाजी मगर, अशोक गाढवे, किशोर कानडे, पांडुरंग गाढवे, अभिजित पाटील, अगतराव गाढवे आदी उपस्थित होते.