तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यामधील एकूण गाव निहाय शेतकरी संख्या 62334  असुन, खरीप हंगाम 2023 मध्ये सोयाबीन या पिकाची पिक पाहणी केलेल्या वैयक्तिक 62334 शेतकरी व सामुदायिक 35890 व  कापूस 1 असे पिकाची ई-पीक पाहणी केलेली खातेदार आहेत. तरी सोयाबीन अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध कागदपत्रे भरुन देण्याचे आवाहन कृषी अधिकारी अवधुत मुळे यांनी केले आहे. 

धाराशिव जिल्ह्यामध्ये  सोयाबीन व कापूस या पिकांचा शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागल.  त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम 2023 मध्ये सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रती हेक्टरी 5000 रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा शासनाने 29 जुलै 2024 च्या शासन निर्णयानुसार केली आहे. त्याची अंमलबजावणी धाराशिव जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे. या  अनुषंगाने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये 1000 तर 0.2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रतिहेक्टर रुपये 5 हजार 2 हेक्टर च्या मर्यादेत म्हणजे जास्तीत जास्त 10,000 रुपये अर्थसहाय्य आधार लिंक खात्यावर देण्यासाठी सध्या शेतकऱ्यांची माहिती घेण्याचे काम सुरू झाले आहे. 2 हेक्टरची मर्यादा ही सोयाबीन या एका पिकासाठी असून कापूस या पिकासाठी 2 हेक्टरची वेगळी मर्यादा आहे. ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2023 मध्ये ई- पीक पाहणी द्वारे आपल्या पिकाची नोंद केलेली आहे त्याच शेतकऱ्यांना सदरचे अनुदान मिळणार असून त्याच्या याद्या जमाबंदी आयुक्तालया मार्फत प्राप्त झाल्या आहेत. त्या ग्रामपंचायत स्तरावर दिनांक 11 ऑगस्ट रोजी व समाज माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या याद्या मध्ये सोयाबीन या पिकाच्या दोन याद्या असून एक यादी वैयक्तिक मालकी असलेल्या शेतकऱ्यांची असून दुसरी यादी सामायिक मालकी असलेल्या शेतकऱ्यांची आहे. सोयाबीन बरोबरच कापूस या पिकाच्याही दोन याद्या अशाच प्रकारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. यानंतर शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या संमती पत्र भरून देणे अपेक्षित आहे, यामध्ये शेतकऱ्यांनी आधार अधिनियम 2016 नुसार आपल्या आधार नंबरचा वापर ओळख पटवण्यासाठी आवश्यक असून या संमती पत्रामध्ये आपले आधार वरील असलेले नाव,आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक मराठी व इंग्रजी मध्ये देणे अपेक्षित आहे. चूक होऊ नये यासाठी या संमती पत्राबरोबर आपल्या आधारची झेरॉक्स कृषी सहायकांना दिली तर अचूक आधार क्रमांक पोर्टलवर टाकता येणार आहे. याशिवाय ज्या  क्षेत्रावर सामायिक खातेदार आहेत. त्यापैकी एकाच खातेदाराच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर अनुदान जमा होणार असल्याने इतर खातेदारांची ना हरकत पत्र सोबत जोडणे अपेक्षित आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी  सामायिक खातेदाराच्या बाबतीत ज्यांचे नावे अनुदान जमा करावयाचे आहे त्या एकाच खातेदाराचे नाव देऊन इतर खातेदारांनी ना हरकत प्रमाणपत्रावर सही करणे गरजेचे आहे. सदरचे संमती पत्र तसेच सामायिक खातेदारांचे ना हरकत पत्र आपल्या गावाच्या कृषी सहायकांकडे किंवा नजीकच्या सीएससी केंद्रामध्ये शेतकऱ्यांना मिळेल. शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले संमती पत्र व नाहरकत पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये संकलित करून शासनाने महाआयटी कडून तयार केलेल्या वेब पोर्टलवर शेतकऱ्यांची माहिती भरली जाणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून वैयक्तिक व सामायिक खातेदारांच्या अनुदानाच्या अर्थसहायची परिगनना मदत व पुनर्वसन विभागाकडून अनुसरण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीनुसार करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2023 मध्ये ई पीक पाणी मध्ये आपल्या सोयाबीन व कापूस पिकाची नोंद केलेली आहे. त्या शेतकऱ्यांची वरील प्रमाणे माहिती एकत्रित करून त्यानंतर ती वेबपोर्टलवर भरली जाणार असल्याने दिनांक 14 ऑगस्ट 2024 पर्यंत शेतकरी बांधवांनी आपली माहिती आपल्या गावाचे कृषी सहाय्यक किंवा कृषी पर्यवेक्षक यांच्याकडे जमा करावी यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकरी गट प्रगतशील शेतकरी यांची मदत घेण्यात येत असून कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक यांना यांच्याकडे गावांची संख्या जास्त असल्याने सदरचे फॉर्म एकत्रित करण्यासाठी कोणत्या गावांमध्ये सदरचे अधिकारी येणार आहेत. याची तारीख ग्रामपंचायत स्तरावर तसेच गावातील समाज माध्यमावर प्रसिद्ध केली जाईल. ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2023 मध्ये ऑनलाइन ई-पिक पाहणी केलेली आहे. अशा सोयाबीन पिकामध्ये वैयक्तिक शेतकऱ्याची धाराशिव जिल्ह्याची संख्या 3,74,913 असून सामायिक खातेदार शेतकऱ्यांची संख्या 2,03,667 आहे. तसेच कापूस या पिकामध्ये वैयक्तिक शेतकऱ्यांची संख्या 2899 असून सामायिक खातेदार क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची संख्या 1037 आहे. अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयापिकपास संपर्क करावा.

 
Top