धाराशिव (प्रतिनिधी) वागदरी येथील जिल्हा परिषद शाळेला डोंबिवली येथील सिस फाउंडेशनच्या पुढाकारातून 10 संगणक आणि फर्निचर सह अद्ययावत संगणक कक्षाची भेट देण्यात आली. बंगलोर येथील डॉ. धनंजय पाटणकर यांनी आपले आजोबा कै.पांडुरंग बापूजी पाटणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिलेल्या निधीमधून हा संगणक कक्ष साकारता आला.

डोंबिवली, जिल्हा ठाणे  येथील सिस फाउंडेशन हे ग्रामीण आणि अविकसित भागातील विद्यार्थ्याना डिजिटल स्किल्स प्राप्त व्हावीत, त्यांना ई-लर्निंगचे तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे या दृष्टीने विविध उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात प्रभावीपणे राबवित असते. या पार्श्वभूमीवर  पोलीस प्राधिकरण मुंबई चे न्यायिक सदस्य आणि वागदरीचे सुपुत्र श्री.उमाकांत मिटकर यांनी सिस फाउंडेशनचे विश्वस्त अभिजित जोशी यांच्याशी आपल्या गावात शाळेमध्ये विद्यार्थ्याना अद्ययावत दर्जाचे शिक्षण देण्यासाठी काय करू शकू याबाबत चर्चा केली होती.  त्या संदर्भात अभिजित जोशी यांनी बंगलोर येथील डॉ.धनंजय पाटणकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ताबडतोब आपले आजोबा कै.पांडुरंग बापूजी पाटणकर यांचे स्मृतिप्रीत्यर्थ वागदरी येथील जि.प.प्रा. शाळेच्या संगणक कक्षासाठी निधी देण्याची तयारी दाखवली. फक्त एका महिन्याच्या कालावधीत श्री.उमाकांत मिटकर,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ जत्ते मॅडम, शिक्षक श्री.लोहार सर आणि इतर ग्रामस्थ यांच्या पाठपुराव्यामुळे आणि मेहेनतीमुळे 15 ऑगस्ट 2024 रोजी 10 संगणक आणि फर्निचर सह अद्ययावत संगणक कक्षाचे समर्पण श्री.अभिजित जोशी,विश्वस्त सिस फाउंडेशन डोंबिवली यांच्या उपस्थितीत जि.प.प्रा. शाळा वागदरी, ता. तुळजापूर, जि.धाराशिव येथे करण्यात आले.

महाराष्ट्राच्या दुर्गम आणि अविकसित जिल्ह्यामध्ये संगणक तंत्रज्ञानाच्या शैक्षणिक सोयी पोचवू शकलो आणि थोड्या प्रमाणात समाजऋण फेडता आले याचाच आनंद मोठा आहे अशी भावना अभिजित जोशी यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केली. या प्रकल्पासाठी आर्थिक मदत तात्काळ उपलब्ध करून देणारे बंगलोरचे डॉ. धनंजय पाटणकर यांचे विशेष आभारही मानले. सिस फाउंडेशनतर्फे या शैक्षणिक वर्षातील हा दुसरा प्रकल्प आहे आणि असे 10 प्रकल्प या शैक्षणिक वर्षात पूर्ण करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी बोलताना संगणक कक्ष समर्पण कार्यक्रमासाठी आवर्जून हजर असलेले  राज्य पोलीस प्राधिकरण मुंबईचे न्यायिक सदस्य आणि वागदरीचे सुपुत्र उमाकांत मिटकर यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा अशी आमच्या धाराशिवची ओळख आहे.ती ओळख पुसण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. या संगणक कक्षाच्या माध्यमातून शाळेसाठी दिलेली मदत ही आमच्यासाठी लाखमोलाची आहे. आता आम्ही याचा उपयोग देश-विदेशातील तज्ञ मार्गदर्शक तसेच इतर शैक्षणिक उपयोगासाठी करणार आहोत त्यामुळे तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत असे मनोगत व्यक्त केले.

संगणक कक्ष समर्पण कार्यक्रमास श्री.बाळासाहेब हंगरगेकर,सरपंच,उपसरपंच,सदस्य यांची उपस्थिती होती. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.तानाजी लोहार यांनी केले.मुख्याध्यापिका जत्ते मॅडम यांनी  समर्पण कार्यक्रमासाठी हातभार लावणाऱ्या सर्व मंडळींचे, बंगलोर निवासी डॉ. धनंजय पाटणकर व श्री उमाकांत  मिटकर यांचे आणि सिस फाउंडेशन डोंबिवली यांचे आभार  मानले. शाळेतील विद्यार्थी, पालक आणि वागदरीचे ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.

 
Top