धाराशिव (प्रतिनिधी) - बापूजींच्या तत्त्वाशी एकनिष्ठ राहून प्रा. डॉ. विद्या देशमुख यांनी कार्य केले. असे प्रतिपादन भारती विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात पदार्थ विज्ञान विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. विद्या जयसिंगराव देशमुख यांच्या सेवा गौरव समारंभात ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, मी शिवाजी विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून कार्य करत असताना डॉ.विद्या देशमुख या विद्यार्थीनी म्हणून शिकत होत्या.त्यांची शिक्षणाबद्दलची चिकाटी आणि प्रामाणिकपणा मी पाहिला आहे. त्यांनी मिरज आणि धाराशिव या ठिकाणी प्रामाणिक आणि शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या तत्त्वाशी एकनिष्ठ राहून सेवा पूर्ण केली आहे. डॉ. देशमुख यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नवीन पिढीने कार्य करत राहावे असेही ते यावेळी म्हणाले.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य नानासाहेब पाटील हे होते. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख डॉ.जयसिंगराव देशमुख हे होते. 

यावेळी कुलगुरू डॉ माणिकराव साळुंखे यांच्या सुवेध पत्नी साळुंखे, डॉ. रमेश दापके, डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कायला कृष्णमूर्ती, श्रीमती सुशिलादेवी साळुंखे अध्यापक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.प्रकाश कांबळे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप देशमुख यांनी केले तर आभार प्रा. माधव उगिले यांनी मानले. 

 
Top