धाराशिव (प्रतिनिधी)-जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी तसेच संघटनेच्या मूलभूत प्रश्न व मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेने गुरुवार (दि.29) पासून बेमुदत राज्यव्यापी बंद पुकारला आहे. धाराशिव नगर परिषदेतील संवर्ग अधिकारी, कर्मचारीही यामध्ये सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत नगरपरिषद, नगरपंचायतीमधील सन 2005 नंतरच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. तसेच जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे दोन्ही कारणांसाठी राज्यातील सुमारे 3 हजार अधिकारी आणि स्थानिक आस्थापनेवरील 60 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने संघटनेच्या वतीने 14 ऑगस्ट रोजी विशेष सभा घेऊन 28 ऑगस्टपर्यंत मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास 29 ऑगस्टपासून बेमुदत राज्यव्यापी संप करण्याचे निश्चित करण्यात आले. तरीदेखील सरकारने दखल न घेतल्यामुळे आता महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेने बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. धाराशिव येथील नगरपरिषद कार्यालयासमोर गुरुवारी नगर परिषदेतील संवर्ग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करुन मागण्यांकडे लक्ष वेधले.
या आंदोलनात धाराशिव नगर परिषदेतील पृथ्वीराज पवार, कौस्तुभकुमार घडे, संदिप दुबे, प्रदीप मोटे, अशोक फडतरे, प्रदीप स्वामी, गजानन धुमाळ, संज्योत सावंत, प्रतीक्षा लोंढे, पार्वती कदम, मनोज कल्लूरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले आहेत.