धाराशिव (प्रतिनिधी)- ठेकेदाराने केलेल्या रस्त्याच्या कामाच्या मोजमाप पुस्तिकेमवर सह्या करण्यासाठी पंचासमक्ष दहा हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्याला कलम -7 अन्वये चार वर्षे कारावास व 50 हजार रूपये दंड तसेच कलम 13 (1-ड) 13 (2) अन्वये सात वर्षे कारावास व 50 हजार दंड आणि दंड न भरल्यास 3 महिने कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.
माहितीनुसार ठेकेदाराने धाराशिव ते गडदेवधरी हा रस्ता तयार केला होता. त्यांच्या मोजमाप पुस्तिकेवर सही करण्यासाठी शाखा अभियंता वर्ग-2 शंकर विश्वनाथ महाजन यांनी 12 हजार रूपयांची लाच मागितली. तडजोडीअंती पंचासमक्ष 10 हजारांची लाच स्विकारली. या प्रकरणी धाराशिव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या न्यायालयासमोर हा खटला चालला. तत्कालीन पोलिस उपाधिक्षक अश्विनी भोसले या तपास अधिकारी होत्या. सरकारी वकील म्हणून पी. के. जाधव यांनी युक्तिवाद केमला. आरोपीकडून ॲड. पी. एम. नळेगावकर यांनी बाजू मांडली. पैरवी अधिकारी म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नानासाहेब कदम व ए. एस. मारकड यांनी काम पाहिले.