उमरगा (प्रतिनिधी)- शहरातील काळे प्लॉट येथील मेंदू मृत झालेल्या 13 वर्षीय मुलाच्या आई वडिलांनी व नातेवाईकांनी मुलाचे अवयवदान करून सहा जणांना जीवनदान देवून समाजापुढे आदर्श ठेवला. गुरुवारी दि.1 ऑगस्ट रोजी अवयवदान केल्यानंतर उमरगा येथे दुर्दैवी मुलावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
उमरगा शहरातील काळे प्लॉट येथील माजी नगरसेविका सूनंदाबाई गुलाबराव वरवंटे या वास्तव्यास असून त्यांच्या मुलगा बाळासाहेब यांचा 13 वर्षीय मुलगा पृथ्वीराज हा सोमवारी दि.29 जुलै रोजी रोजच्यासारखे सकाळी सायकल खेळून परिसरात असलेल्या जिल्हा परिषद शाळेत गेला. शाळेच्या सकाळच्या प्रार्थनेवेळी त्याला अचानक चक्कर येऊन पडल्याने उमरगा शहरातील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथील मेंदू विकार तज्ञ डॉ.प्रसन्न कासलेवार यांच्या चंदन न्युरो सायन्सेस हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. यावेळी केलेल्या चाचण्यात पृथ्वीराज याचा मेंदू बंद पडल्याचे दिसून आले पण त्याचे बाकी सर्व अवयव काम करीत होते. त्यानंतर मेंदूच्या केलेल्या तपासण्यानंतर डॉ. कासलेवार यांनी इतर मेंदू विकार तज्ञ डॉ.विनय जोशी, डॉ.निखिल नवले, डॉ.शरद जाधव सारख्यांचे मार्गदर्शन घेत पृथ्वीराज याचा मेंदू मृत झाल्याच्या निष्कर्षापर्यंत आले.त्यानंतर त्यांनी पृथ्वीराज याचे आई सुमन व वडील बाळासाहेब व नातेवाईकांना याबाबत माहिती दिली.त्यानंतर त्यांना अवयवदान करून कित्येक जणांना जीवनदान देता येईल याचीही जाणीव करून दिली.पृथ्वीराज याच्या आईवडिलांनी व नातेवाईकांनी पृथ्वीराज याची शारीरिक परिस्थिती स्वीकारत आपल्या मुलाचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला व लेखी संमती दिली. गुरुवारी दि.1 रोजी पृथ्वीराज यास उमरगा येथे दुपारी आणण्यात आले.यावेळी चंदन न्युरो सायन्सेस हॉस्पिटलची पथकाने कागदोपत्री सर्व प्रक्रिया पार पाडून पृथ्वीराज याचे दोन डोळे,दोन किडनी,दोन फुफ्फुस,यकृत व स्वादुपिंड असे अवयव काढण्यात आले.त्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात पृथ्वीराज यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पृथ्वीराज याच्या मृत्यू व त्याच्या कुटुंबियांच्या अवयव दानाच्या निर्णयाची खबर उमरगा शहरात पसरल्यानंतर नागरिकांतून मोठी हळहळ व्यक्त केली जात होती तसेच अवयवदानाच्या निर्णयाचे ही सर्वत्र कौतुक होत आहे. पृथ्वीराज याचे पार्थिव काळे प्लॉट येथील त्याच्या घराकडे गुरुवारी आणण्यात आल्यानंतर नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
10 ते 16 वयोगटातील 6 मुलांना या अवयवदानामुळे जीवनदान मिळणार असून पृथ्वीराज यांच्या कुटुंबीयांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्यानंतर संपूर्ण भारतातून अवयवसाठी कित्येकांनी संपर्क साधल्याचे उमरगा येथे आलेल्या डॉक्टरांनी सांगितले.सर्व निकष पूर्ण करून योग्य मुलाला हे अवयव मिळणार असल्याचे ही डॉक्टरांनी सांगितले.