तुळजापूर (प्रतिनिधी) - श्री तुळजाभवानी मंदिरात 8 कोटी 45 लाख 97 सहस्र रुपयांचा दानपेटी घोटाळा झाला होता. या घोटाळ्याचे अन्वेषण बंद करण्याचा सरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपिठाने रद्दबातल ठरवला, तसेच आधीच्या चौकशी समितीने दोषी ठरवलेले लिलावदार, मंदिर कर्मचारी, विश्वस्त, सरकारी अधिकारी-कर्मचारी आदी 16 दोषींवर तुळजापूर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे नोंदवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. असे असूनही न्यायालयाच्या या आदेशाची कार्यवाही करण्यात आली नाही. या सर्व दोषींकडून या घोटाळ्यातील धनराशी वसूल करण्यात यावी, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य तथा मुंबई उच्च न्यायालयाचे पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांनी केली. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ‌‘तुळजापूर घोटाळाप्रकरणी न्यायालयीन संघर्ष' या विषयावर बोलत होते.

यावेळी बोलताना पुढे  ते म्हणाले, “हिंदु जनजागृती समितीने तुळजाभवानी देवस्थान मंडळाच्या विरोधात उच्च न्यायालयात एक फौजदारी जनहित याचिका प्रविष्ट केली होती. या याचिकेच्या सुनावणीनंतर न्यायालयाने दोषींवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश दिले होते. दुर्दैवाने त्याची कार्यवाही झाली नाही. तरी या भ्रष्ट अधिकाऱ्यांना शिक्षा होईपर्यंत आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा चालूच ठेवणार आहोत. तसेच मंदिरे भक्तांच्या हाती यावीत, यासाठी सरकारीकरण झालेल्या भ्रष्ट मंदिर प्रशासनाच्या विरोधातील लढा चालूच ठेवावा लागणार आहे. आपण सर्व अधिवक्ते, धर्माभिमानी, भाविक-भक्त मिळून हा लढा अधिक व्यापक करण्याचा संकल्प करूया.”

श्री तुळजापूर मंदिरातील भ्रष्टाचाराच्या विरोधात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आंदोलन उभारायला हवे -  किशोर गंगणे 

श्री तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीमध्ये प्राप्त झालेले पैसे, दागिने यांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. ठेकेदार आणि विश्वस्त यांनी संगनमताने देवनिधीची लूट केली. तुळजापूर देवस्थानमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाईसाठी पाठपुरावा केल्यावर सरकारने सी.आय्.डी. चौकशी लावली; मात्र या प्रकरणी अद्याप कारवाई झालेली नाही. याविषयी पू. अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात याचिका केली. त्यानंतर न्यायालयाने विश्वस्तांवर खटला प्रविष्ट करण्याचा आदेश दिला. हा आदेश देऊन 50 दिवस झाले तरी त्यावर कारवाई झालेली नाही. या भ्रष्टाचारामध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि मंदिरांचे विश्वस्त गुंतले आहेत. याची चौकशी संथगतीने चालू आहे. याविषयी मुख्यमंत्र्यांनाही निवेदन दिले आहे; मात्र त्यानंतरही कार्यवाही झालेली नाही. सरकार हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे. श्री तुळजापूर मंदिरातील या भ्रष्टाचाराच्या विरोधात जिल्हाजिल्ह्यांमध्ये आंदोलन उभारायला हवे, अशी मागणी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात श्री. किशोर गंगणे यांनी केली.

 
Top