धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील आळणी येथील स्वाधार मतिमंद मुलींच्या बालगृहात ऑल इंडिया पयाम-ए-इन्सानियत फोरम (मानवतेचा संदेश) या संस्थेच्या वतीने अन्नदान करण्यात आले.

धाराशिव येथील हा़िफज उमर खान, डॉ.अर्शद सय्यद, तसेच सौदी अरेबियाहून आलेले सय्यद झाकीर हुसेन, अब्दुल करीम यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वाधार मतिमंद मुलींच्या बालगृहात 116 दिव्यांग मुली आहेत. यातील अनेकजणी अनाथ असून काहीजणी कुठेतरी सोडून दिलेल्या आढळतात. त्यांच्या कुटुंबीयांची ओळख नसताना त्यांना न्यायालयाच्या आदेशाने येथे पाठवले जाते.

बालगृहाचे संचालक शहाजी चव्हाण हे स्वतः लक्ष देऊन त्यांची निवास, भोजन, उपचार व प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था करीत आहेत. येथील 30 पेक्षा अधिक कर्मचारी या मुलींची काळजी घेतात.  या मुलींसाठी मानवतेचा संदेश संस्थेच्या वतीने एका छोट्या पार्टीचे आयोजन कण्यात आले. त्यानंतर शाळेच्या वतीने अन्न पुरवठा अधिकारी पदावर निवड झाल्याबद्दल जयदेवी कांबळे व मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त झाल्याबद्दल डॉ. अरशद सय्यद यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी आपले विचार व्यक्त करुन मानवतेच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचा मानस व्यक्त केला. कार्यक्रमासाठी सुलतान मशायक, अब्दुल्ला खान, हाफिज जुबेर, वसीम शेख़, अली सय्यद, मुन्ना सय्यद यांनी विशेष सहकार्य केले.

 
Top