वाशी (प्रतिनिधी)- जि.प.प्रा.शाळा पार्डी येथे शुक्रवारी (दि.26 जुलै) कारगिल विजय दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जि.प.प्रा. शाळा पारडी येथे कारगिल विजय दिनानिमीत्त कारगिल युध्दात अतुलनीय कामगिरी करणारे ज्यांचा उल्लेख त्यांचे सहकारी “शेर शहा“ असा करत होते ते भारमातेचे सुपुत्र परमवीर कॅप्टन विक्रम बत्रा यांच्याविषयी माहिती दिली. तसेच कारगिल युध्दाचा एक प्रसंग ऐकवला. ही माहिती मुले अगदि मंत्रमुग्ध होऊन ऐकत होती. शेवटी विद्यार्थ्यांनीच भारत माता की जय असे म्हणत जयजयकार केला.
यानंतर विद्यार्थ्यांची कारगिल युध्दाचा प्रसंग कसा असेल यावर अधारीत चित्रकला स्पर्धा व निबंध लेखन घेतले. विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. आजकाल बहूतांश बालके मनोरंजन म्हणून हास्य विनोदाचे व्हिडिओ बघत आपला अमूल्य वेळ वाया घालवताना दिसतात. पण बालकांसमोर अशा शौर्यगाथा त्यांच्यासमोर मांडल्या तर मुलांना एक आदर्श डोळ्यासमोर राहिल. मुलांमधे देशप्रेम, राष्ट्रभक्ती निर्माण होऊन विद्यार्थ्यांनी आपल्या प्रत्येक पावलावर राष्ट्रहिताचा विचार करावा, शौर्यगाथांचे वाचन करावे, जवानांबद्दल आदरभाव ठेवावा व एक सुजान , देशभक्त नागरीक बनावे या उद्देशाने उर्मिला भोसले-कावळे यांनी हा उपक्रम घेतला असे सांगितले. कांही विद्यार्थ्यांनी निबंधलेखनही केले. दरम्यान शिक्षण सप्ताह अंतर्गत आजचा विषय शिक्षणात तंत्रद्न्यानाचा उपयोग याबाबत मुलांना अवगत केले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक नागटिळक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी मु.अ.श्री.नागटिळक सर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, शा.पो.आ. स्वयंपाकी ताई ,विद्यार्थी उपस्थित होते.