उमरगा (प्रतिनिधी)- शहरातील चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाची धिंड काढून फाशीची शिक्षा द्यावी पीडित बालिकेला व कुटूंबाला जलद न्याय मिळवून देत शासनना कडून आर्थिक मदत देण्यात यावी या मागण्यासाठी सोमवारी (दि 29) राष्ट्रीय महामार्गावरून तहसील कार्यालयावर हजारो महिला व युवतीचा आक्रोश मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
तहसीलदार गोविंद येरमे यांना दिलेल्या,निवेदनात असे म्हटले आहे की, एका चार वर्षीय बालिकेवर रात्री आठ ते नऊ च्या सुमारास 13 जुलै अत्याचार केलेला असून मुलीच्या गालाला व शरीरास नखाने ओरबाडले असून, त्या 54 वर्षीय नराधम अनिल देवेंद्र कांबळे (भिमनगर ता. बसवकल्याण, जि.बिदर) याची शहरातून धिंड काढून जशाच तसे या न्यायाने फाशी देवून त्या पिडीत बालिकेस जलद न्याय द्यावे.
उमरग्यातील सर्व गल्लोगल्लीत सिसिटीव्ही.कॅमेरे ताबडतोब बसविण्यात यावे,या मागण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरून हजारो महिला व युवतीनी घोषणा देत आक्रोश मोर्चा काढून तहसीलदाराना निवेदन दिले. या वेळी राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, अविनाश रेणके, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रवक्त्या रेखाताई सूर्यवंशी, मीनाक्षी दुबे, आदीने मोर्चास संबोधित केले. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी जनतेच्या मागण्या शासन दरबारी मांडून पिडीत कुटुंबास जलद न्याय मिळवून देण्यासोबतच सीसिटिव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासह परप्रांतीय भाडेकरूची पोलिसांत नोंद करण्यास सांगून तालुक्यात अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची ग्वाही दिली. आक्रोश मोर्च्यात जिजाऊ ब्रिगेड, ऑल इंडिया धनगर समाज, वीरशैव महिला मंडळ, गौतमीबाई मल्हारराव होळकर महिला मंडळ, राजपूत महिला मंडळ,जीवन संघर्ष महिला संघ यासह शहरासह तालुक्यातील सकल महिला मंडळाच्या हजारो महिला सहभागी झाल्या होत्या.