भूम (प्रतिनिधी)-  भूम, परंडा, वाशीचे माजी आमदार राहुल मोटे यांनी आगामी विधानसभेसाठी पुन्हा दंड थोपडल्याचे सध्या दिसून येत आहे. 

या मतदारसंघाचे माजी आमदार तथा या मतदारसंघावर त्यांच्या परिवाराचे पंचवीस वर्षे वर्चस्व राहिलेले राहुल मोटे हे गेल्या दोन-तीन महिन्यापासून तालुक्यात संवाद दौऱ्याच्या नावाखाली रोज तालुक्यातील विविध गावात जाऊन नागरिकांची संवाद साधून जनतेशी थेट नाते जोडत आहेत. त्यांच्याबरोबर ज्या त्या ठिकाणी त्या गावातील काही ठराविक जेष्ठ नेते व सहकारी यात सहभागी होत आहेत. परंडा भूम व वाशी तालुक्यातील अनेक गावात त्यांच्या आजपर्यंत दोन दोन दौरे झाले आहेत. तसेच मतदारसंघातील मतदाराच्या प्रत्येक कार्यक्रमात स्वतः राहुल मोटे किंवा त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या पत्नी वैशालीताई मोटे, बंधू रणजीत मोटे हे नियमित फिरत असल्याचे चित्र सध्या मतदारसंघात पाहण्यास मिळत आहे. 

तसेच प्रत्येक बुधवारी राहुल मोटे यांच्या गिरवली येथील निवासस्थानी जनता दरबाराचा देखील आयोजन करण्यात येत असते. यावेळी मतदारसंघातील हजारो लोक यामध्ये सहभागी होतात. सध्या मतदारसंघातील वातावरण पाहता राहुल मोटे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तुतारी हे चिन्ह घरोघरी पोहोचण्याचे काम करून पुन्हा संधी देण्याचे व तुतारी वाजवण्याचे आवाहन करत आहेत. एकंदरीत राहुल मोटे यांच्या व्यतिरिक्त दुसरे कोणीही मतदारसंघात फारसं लक्ष देत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना राहुल मोटे हे कुटुंबासोबत मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांशी थेट संपर्क साधत असल्याने मतदार त्यांना पुन्हा संधी देणार की पुन्हा पुन्हा तुतारीचा बाजा वाजणार हे लवकरच पाहण्यास मिळणार आहे.


 
Top