धाराशिव (प्रतिनिधी)- बालसाहित्याचा प्रचार व प्रसार व्हावा. विद्यार्थ्यांना बालसाहित्य वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृती समाजामध्ये रुजावी या अनुषंगाने अमरेंद्र भास्कर साहित्य संस्था, पुणे ही केंद्रीय साहित्य संस्था काम करते.  या साहित्य संस्थेची धाराशिव येथे  शाखा स्थापन करण्यास केंद्रीय संस्थेने दि. 10 ऑगस्ट 2024 रोजी ठरावा द्वारे मान्यता दिलेली आहे. या अ.भा. बालकुमार साहित्य संस्थेच्या धाराशिव शाखेच्या अध्यक्षपदी साहित्यिक युवराज नळे यांची निवड करण्यात आलेले आहे. यासंदर्भात पुणे येथील अमरेंद्र भास्कर अखिल भारतीय साहित्य संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे यांनी तसे पत्र दिलेले आहे. 

धाराशिव जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये पुढील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. सल्लागार मंडळ प्रतिनिधी म्हणून जेष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे व जेष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ अभय शहापूरकर, कार्याध्यक्ष हणमंत पडवळ, कार्यवाह समाधान शिकेतोड, सहकार्यवाह डॉ. रुपेशकुमार जावळे, उपाध्यक्ष भागवत घेवारे, कोषाध्यक्ष संजय धोंगडे, सदस्य, डॉ. सरोजिनी राऊत, सुनिता गुंजाळ कवडे, प्रा अलका सपकाळ, भैरवनाथ कानडे. धाराशिव शाखेच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील 19 वर्षे पर्यंतच्या वयोगटातील बाल, किशोर व कुमार वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार बालसाहित्य पोचविणे, विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती क्षमतेला व्यासपीठ मिळावे म्हणून बालसाहित्य संमेलन, कवीसंमेलन, पुस्तक परिचय लेखन स्पर्धा, ग्रंथालय समृद्धी, बालसाहित्याचा पुस्तक मेळावा असे विविध उपक्रम या शाखेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. 


अमरेंद्र भास्कर अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्थेच्या धाराशिव शाखेच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. वाचन चळवळ गतिमान करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

- युवराज नळे, अध्यक्ष अ.भा.बालकुमार साहित्य संस्था शाखा धाराशिव


विद्यार्थ्यांना दर्जेदार बालसाहित्य वाचन करण्याची आवड निर्माण व्हावी. घराघरात वाचन संस्कृती रुजावी. मुलांच्या सर्जनशीलतेचा, अभिव्यक्तीचा विकास व्हावा. यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी साहित्य संस्थेच्या विविध उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा.

- समाधान शिकेतोड, कार्यवाह तथा बालसाहित्यिक.

 
Top