उमरगा (प्रतिनिधी)- चालण्याचा व व्यायामाचा अभाव, भुख न लागता खाणे, बाहेरचे खाण्यामुळे तसेच आपली जीवनशैली बदलल्याने अनेक आजार उद्भवतात. उपाशी राहण्याने माणसे मरतात. त्यापेक्षा जास्त लोक अती व चुकीचे खाण्यानेही रोग होऊन मरत आहेत. चमचाभर खाल्लो काय आणि पोटभर जेवण केलो तरी तितकेच इन्सुलिन तयार होते. प्रत्येक वेळा कमी खाण्यापेक्षा कमी वेळा आणि भुख लागल्यावरच जेवण करणे. जगात दारु आणि सिगारेटपेक्षा जास्त मृत्यू साखरेमुळे होतात. जठराग्नी प्रज्वलित झाल्यावरच दिवसभरात दोनवेळा जेवण करणे, जेवण 55 मिनिटाच्या आत संपवणे, जेवणामध्ये प्रोटिन वाढवणे व गोड पदार्थ शक्य तितके कमी खाणे, व्यायामाचे सातत्य यामुळे रोगांपासून मुक्ती मिळेल असे मत डॉ. जगन्नाथ दिक्षीत यांनी व्यक्त केले.

ज्ञानज्योती सामाजिक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या संकल्पनेतून जागतिक डॉक्टर दिनाचे औचित्य साधुन  सोमवारी (दि.1) उमरगा व लोहारा तालुक्यातील डॉक्टरांचा सन्मान, मधुमेह व आहार तज्ञ डॉ. जगन्नाथ दिक्षीत यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. विनोद जाधव, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनंत मुगळे, डॉ. दीपक पोफळे, डॉ. उदय मोरे, डॉ. अनिकेत इनामदार, डॉ. विजय बेडदुर्गे आदीसह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. दीक्षित म्हणाले की, दररोज प्रत्येकाला सरासरी 2 हजार कॅलरीज उर्जा लागते. स्वादुपिंडातून प्रतिदिन 18 ते 32 हजार युनिट इन्सुलिन तयार होतात. देशात 12 कोटी लोक शुगरचे रुग्ण आहेत. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी प्रास्ताविक केले. प्रा. रविंद्र गायकवाड यांनी अध्यक्षीय समारोपात केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रविण स्वामी यांनी मानले.

 
Top