धाराशिव (प्रतिनिधी) - सरकारने मराठा समाजाला ओबीसी मधून किंवा स्वतंत्र आरक्षण देण्याचा जो काय निर्णय घ्यायचा तो लवकरात लवकर घ्यावा. अन्यथा क्रांतीदिनी म्हणजे दि.9 ऑगस्टपासून तुळजापूर येथे आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन सर्व जाती धर्मांतील अठरापगड बारा बोलतेदार समूहांच्या सर्व मावळ्यांना सोबत घेऊन. छत्रपती शिवाजी महाराजांनचे विचार हेच क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटलांनी दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करीत मराठा आरक्षणासह कर्जमाफी ,वीज माफी द्यावी ,या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार घेऊन संपूर्ण राज्यभर आंदोलनाची सुरुवात करणार असल्याचा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे - पाटील यांनी दि.29 जुलै रोजी दिला.

धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा संपर्कप्रमुख राजाभाऊ साळुंके, शशिकांत पाटील, अमोल गोरे, ज्योतीराम काळे, रोहित पाटील, विठ्ठल यादव, रवी साळुंके, वाहतूक आघाडीचे प्रमुख शिवहरी भोसले, प्रशांत पवार, अमोल मोरे, इतर कार्यकर्ते उपस्थित होते. 

पुढे बोलताना जावळे - पाटील म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी स्व. अण्णासाहेब पाटील, छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्व अण्णासाहेब जावळे पाटील यांच्यासह अनेकांनी बलिदान दिलेले आहे. तर आता मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून राज्यभरात मोठे आंदोलन उभे राहिले आहे. मात्र अद्यापपर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिलेले नाही. अखिल भारतीय छावा संघटना ही केवळ स्वतःच्या हिमतीवर समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या नेत्यांनी व पुढाऱ्यांनी आरक्षणावरुन भांडण लावून फूट पाडून कुठल्याही प्रकारचे विष कालविण्याचे काम करू नये, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. छावा संघटनेने गेले तीस वर्षे मराठा आरक्षणाचा महाराष्ट्रात लढा चालू ठेवलेला आहे याच्याही पुढे छावा संघटना मराठा आरक्षणासाठी आक्रमक राहील. छावा संघटना कधीच आमदारकी,खासदारकी साठी राजकीय भूमिका घेतली नव्हती याच्यापुढेही कधी घेणार नाही असे ब्रीद वाक्य नानासाहेबांनी या पत्रकार परिषद सांगितले.


 
Top