धाराशिव (प्रतिनिधी) -महाराष्ट्र राज्यातील शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालया अंतर्गत 2024 -25 साठी प्रवेश पात्र विद्यार्थी कागदपत्रा अभावी प्रवेशापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे कागदपत्राची अट तात्काळ स्थिती करून विद्यार्थ्यांनी कागदपत्रांसाठी दाखल केलेल्या पोहोच पावतीवर प्रवेश देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे धाराशिव कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे यांनी ई-मेलद्वारे राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे दि.23 जुलै रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये शासकीय तंत्रनिकेतन अंतर्गत सुरू असलेल्या 2024 - 25 या शैक्षणिक वर्षातील सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग व ड्रेस डिझायनिंग अँड गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग आदींसह इतर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण केलेली आहे. मात्र त्यांना आवश्यक असलेली जात प्रमाणपत्र, एसईबीसी प्रमाणपत्र, ईडब्लूएस, क्रिमिलियर आदींसह इतर कागदपत्रांची आवश्यकता असते. ही प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयाकडे ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केलेले आहेत. मात्र महसूल कर्मचाऱ्यांचा संप व संबंधित वेबसाईटचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे ती कागदपत्रे काढण्यास विलंब होत आहे. त्यामुळे धाराशिव येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या 160 विद्यार्थ्यांना या प्रक्रियेमुळे प्रवेशापासून वंचित राहण्याची दुर्दैवी वेळ ओढावली आहे. तर राज्यात हजारो विद्यार्थी या प्रमाणपत्र अभावी प्रवेशापासून वंचित राहण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सदरील प्रमाणपत्र काढण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून त्याचा प्रस्ताव रीतसर दाखल केलेल्या विद्यार्थ्यांकडे असलेल्या पोहोच पावतीच्या आधारे प्रवेशास विद्यार्थ्यांना ग्राह्य धरुन त्यांना प्रवेश द्यावा, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.

 
Top