धाराशिव (प्रतिनिधी)- युवा वर्गाला रोजगार व नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही राज्य सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. विविध यंत्रणेत काही रिक्त पदे आहेत, त्यामुळे आहे त्या अधिकारी - कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येतो.या योजनेच्या माध्यमातून एकूण मंजूर पदांच्या 5 टक्के मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.तेव्हा यंत्रणांनी या योजनेअंतर्गत मनुष्यबळाची मागणी त्वरित नोंदवावी.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी केले.
आज 23 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारणी समितीची सभा जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली “ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या “ अंमलबजावणीसाठी घेण्यात आली.यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.ओंबासे म्हणाले, जिल्हाला या योजनेअंतर्गत लोकसंख्येनुसार 2 हजार मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट दिले आहे. या योजनेअंतर्गत मनुष्यबळाची मागणी शासकीय व खाजगी आस्थापना यांना करता येणार आहे.जे रोजगार इच्छुक 18 ते 35 वयोगटातील उमेदवार आहे,त्यांनी महास्वयंम पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी. या योजनेतून बेरोजगार युवा वर्गाला रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे असे त्यांनी सांगितले.
श्री.गुरव यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही अत्यंत उपयुक्त व युवा वर्गाला रोजगार उपलब्ध करून देणारी योजना असल्याचे सांगितले. शासकीय आस्थापना व खाजगी आस्थापनामध्ये मंजूर मनुष्यबळाच्या 5 टक्के मनुष्यबळ या योजनेतून उपलब्ध होणार आहे.ज्यांना रोजगार नोकरी मिळत नाही अशा 18 ते 35 वर्ष वयोगटातील युवावर्गाला यातून रोजगार मिळणार आहे.त्यांना कामाचा अनुभव घेण्यासाठी सहा महिने या योजनेतून काम करता येणार आहे. रोजगार इच्छुकांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.प्रत्येक महिन्याच्या 30 दिवसांपैकी 20 दिवस कामावर उपस्थित राहून काम करावे लागणार आहे.शैक्षणिक अहर्तानुसार विद्यावेतन देण्यात येणार आहे.यावेळी श्री.गुरुव यांनी या योजनेबाबतचा 9 जुलै 2024 च्या शासन निर्णयाची माहिती दिली. मनुष्यबळाची मागणी कशाप्रकारे करावी याबाबतचा विहित नमुना यंत्रणांनी कशाप्रकारे भरावा याबाबत देखील त्यांनी विस्तृत माहिती दिली. सभेला विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.