भूम (प्रतिनिधी)- ओ.बी.सी., एस.सी., एस.टी., आरक्षण बचाव यात्रा ही कोणाच्या विरोधात नाही. माझ्या मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत अनेक बैठका व चर्चा झाल्या आहेत. प्रत्येक वेळी मी त्यांना हेच समजावत आलो आहे की, ज्यांचा तुम्ही प्रश्न मांडताय तो रास्त असला तरी तो मांडण्याची पद्धत चुकीची आहे. असे मी जरांगे पाटील यांना सांगितले आहे. असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले ते भूम येथे आयोजित ओ.बी.सी., एस.सी., एस.टी. आरक्षण बचाव रैली दरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करत होते.
मी इथल्या सर्व गरीब मराठ्यांना सांगू इच्छितो कि, तुम्ही ओ.बी.सी. ना दोष देऊ नका. तुम्ही ओ.बी.सींच्या ताटातील मागू नका. इथला जो श्रीमंत मराठा आहे म्हणजेच निजामी मराठा आहे तो 1960 सालापासून सत्तेत बसलेला आहे. त्याची श्रीमंती वाढत गेली आणि मराठ्यांची गरिबी वाढत गेली. दोष द्यायचा असेल तर तो निजामी मराठाण्यांना द्या. त्यांच्यामुळेच इतर मराठा समाजाला शेतीवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक गरीब मराठा समाज विकलांग होत आहे. शेतकऱ्यांच्या फायद्याचे कायदे करण्याची हिम्मत, ताकद या सरकारमध्ये नाही. आज निजामी मराठ्यांमुळेच गरीब मराठ्याची ही बिकट अवस्था झालेली आहे. मागील 20 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकेच्या साहाय्याने मोठया कारखानदारांचे साडे सहा लाख कोटी कर्ज माफ केले आहे. हे सरकार गरिबांचे सरकार नाही. हे सरकार श्रीमंतांचे सरकार आहे. मनोज जरांगे यांनी मराठ्यांना ओ.बी.सी. मधून आरक्षणाची मागणी केली आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांना खुलेपणाने विचारतो की मराठा आरक्षणाची जरांगे पाटलांची मागणी तुम्हाला मान्य आहे की नाही. तुम्ही पक्ष चालवताय महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहता केंद्रात मंत्रीपदे सांभाळली आहेत आणि तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. शरद पवारांची साठ वर्ष राजकारणात गेली अनेक वर्ष मुख्यमंत्री म्हणून राहिले केंद्रामध्ये मंत्री म्हणून काम पाहिले व त्यांच्या अंगी आणखीही निर्णय क्षमता नाही . आरक्षण च्या परिस्थितीने आता सामाजिक भांडणाचे स्वरूप धारण केलेले आहे. आता ही भांडणे याच्या त्याच्या लग्नाला जायचे नाही, दुकानाला जायचे नाही इथपर्यंत येऊन ठेपली आहेत. ही सामाजिक द्वेषाची बीजे पेरली गेली आहेत व ही बीजे खोलवर रुजली आहेत. अशा परिस्थितीमध्ये पळ काढणाऱ्या नेत्यांना लोकांनीच राजकारणातून पळवून लावणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचे सामाजिक जीवन हे छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, यशवंतराव चव्हाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वसंतराव नाईक यांनी घडवलेले आहे . व्ही.जे.एन.टी. ला आरक्षण देणे हा सोपा मुद्दा नव्हता मात्र यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांनी हिम्मत दाखवून तो निर्णय घेतला. जरांगे पाटलांची मागणी तुम्ही मान्य करता किंवा नाही हे सांगण्याची समाजासमोर तुम्हाला तुमची हिम्मत नाही त्यांची मागणी योग्य की अयोग्य आहे हे देखील तुम्ही सांगू शकत नाहीत. शासन निर्णय घेण्याची हिंमत दाखवत नाही त्यामुळे गरीब मराठ्यांनी येणाऱ्या विधानसभेला योग्य विचार करणे गरजेचे आहे. ते जर पुन्हा श्रीमंत निजामी मराठ्यांच्या पाठीशी राहिले तर आजपर्यंत जसे सत्तर वर्षे ते आर्थिक मागास राहिले तसेच ते इथून पुढेही सत्तर वर्ष आर्थिक मागासच राहतील. एखादा समाज जर पूर्वी श्रीमंत असेल आणि काळाच्या ओघात जर तो आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास झाला असेल तर त्या समाजाने सरकारकडे मदत मागणे हा त्यांचा अधिकार आहे. ही यात्रा राजकीय फायद्यासाठी नाही. आरक्षणाला राजकीय प्रश्नच राहूद्या त्याला सामाजिक प्रश्नाचे स्वरूप देऊ नका. तरच सामाजिक परिस्थिती सुरळीत राहील. यावेळी प्रदेक्षाध्यक्ष रेखाताई ठाकूर, वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल, जिल्हाध्यक्ष बी.डी.शिंदे , रमेश बारस्कर, अविनाश भोसीकर, भूम ता. अध्यक्ष मुसाभाई शेख, वैभव गायकवाड, रोहित गायकवाड, अक्षय गायकवाड, धीरज गायकवाड , मुकुंद लगाडे, महावीर बनसोडे यांच्यासह तालुक्यातील ओ.बी.सी., एस.सी., एस.टी. समाज बांधव मोठया संख्येने हजर होते.