धाराशिव (प्रतिनिधी)-सकल धनगर समाजाचे एस.टी मधून आरक्षण व अंमलबजावणी करून प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू आहे.
धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण देऊन प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी सकल धनगर समाज धाराशिव जिल्हा यांचे जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्यासमोर आज (दि.16) दुसऱ्या दिवशी आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषण स्थळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांनी आपले सहकारी धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, सामाजिक न्याय विभाग जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ जानराव यांच्यासह भेट दिली व धनगर समाजाला एस.टी मधून आरक्षण मिळावे यासाठी पाठिंबा दर्शविला.
उपोषण कर्ते श्याम तेरकर,कमलाकर दाणे,समाधान पडळकर,राजू मैंदाड तसेच उपस्थित धनगर बांधव यांच्या सोबत चर्चा केली. . जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवरून चर्चा करून धनगर समाजाच्या उपोषणा संबंधी माहिती कळविली. धनगर समाजाच्या चालू असलेल्या उपोषणाला शासनाच्या वतीने भेट देण्यात यावी असे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी मा.जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवरून सांगितल्यानंतर मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मा.तहसीलदार यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन उपोषण कर्ते व मा.जिल्हाधिकारी यांचा फोन द्वारे तहसिलदार यांनी संवाद घडवून आणला. धनगर समाजाचा प्रश्न आपण सरकार दरबारी मांडू असे तहसीलदार यांच्या वतीने सांगण्यात आले. जोपर्यंत धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळत नाही व त्याची अंमलबजावणी करून प्रमाणपत्र देण्यात येत नाही तोपर्यंत सकल धनगर समाजाचे आरक्षण चालूच राहील असे उपोषणकर्त्याच्या वतीने तहसीलदार यांना सांगण्यात आले.