तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासन वनविभागाच्या सामाजिक वनीकरण परिक्षेत्र तुळजापूरच्या वतीने अमृतवृक्ष आपल्या दारी वन महोत्सव 2024 या मोहिमेच्या स्टॉलचे उदघाटन टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण स्नेही गणेश चादरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.  याप्रसंगी, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रशांत अपराध, बाळासाहेब चिखलकर, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र तुळजापूरचे वनपाल शहाजी देशमुख, भोजने, वनरक्षक वळसे व सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.  

याप्रसंगी, श्री.गणेश चादरे म्हणाले की, भारत सरकारने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक पेड माँ के नाम ही मोहीम सुरू केली. महाराष्ट्र सरकारच्या वन विभागाच्या वतीने अमृतवृक्ष आपल्या दारी ही योजना पर्यावरण संवर्धनासाठी सुरू करण्यात आली असून गाव तिथे वन महोत्सव हा कार्यक्रम लोकचळवळ म्हणून पुढे आणण्यासाठी व त्यामाध्यमातून पर्यावरण समतोल राखण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढतं असलेले शहरीकरण व औद्योगिकरण त्यामुळे वातावरण बदल होऊन जागतिक तापमानात वाढ होत आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी आणि पर्यावरणीय नैसर्गिक सौंदर्य टिकवण्यासाठी एक पेड माँ के नाम ही मोहीम व अमृतवृक्ष आपल्या दारी या योजना अत्यंत महत्वाच्या असून यामध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेवून वृक्ष लागवड व संवर्धन करण्यासाठी जिथे घर, तिथे माणसं, जिथे माणसं, तिथे वृक्ष या न्यायाने वृक्षांची लागवड करून त्याला आपल्या आईचे, वडिलांचे व मुलामुलींचे नाव देवून आपल्या पाल्याप्रमाणे त्याचे संगोपन करावे असे आवाहन केले. सामाजिक वनीकरण परिक्षेत्र तुळजापूर यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत लागवड केलेल्या मियावॉकी व 14 हेक्टर वरील 22 प्रकारच्या वृक्ष लागवड व शंभर टक्के संवर्धनाच्या कामाचे कौतुक ही केले.  

याप्रसंगी, रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री प्रशांत अपराध म्हणाले की, रोटरी क्लब हा सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित असून त्यातीलच एक महत्वाचा उपक्रम म्हणून आम्ही या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणार असल्याचे सांगितले.                                          

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, करताना वनपाल शहाजी देशमुख यांनी अमृतवृक्ष आपल्या दारी ही योजना 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये वन महोत्सव म्हणून साजरी करण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून वृक्ष लागवड व संवर्धन याचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. या कालावधीमध्ये लोकांना शासनामार्फत सवलतीच्या दरात रोपांचा पुरवठा करण्यात येणार असून नागरिकांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन केले.  हा कार्यक्रम सामाजिक वनीकरण परिक्षेत्र तुळजापूरचे आरएफओ नागनाथ पचरंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी डोंगरे, निशा औताडे, तानाजी पवार, रामराव चौरे, भागवत जाधव व राम माने यांनी अथक परिश्रम घेतले.

 
Top