धाराशिव (प्रतिनिधी)- महायुती सरकारने चालू पावसाळी अधिवेशनात राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण“ ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला.  दि.01 जुलै ते 15 जुलै पर्यंत सदर योजनेमध्ये आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करायचे आहेत. या अनुषंगाने  दि.01 जुलै रोजी प्रतिष्ठान भवन, भाजपा कार्यालय धाराशिव येथे सौ. रमा दत्ता घोडेराव रा. धाराशिव या भगिनीचा अर्ज प्राथमिक स्वरूपात भरून योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अस्मिताताई कांबळे आणि सागरबाई घोडेराव उपस्थित होत्या.

या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लक्ष रुपये पेक्षा कमी असणाऱ्या 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा रु. 1500 मानधन देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांनी आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, बँक पासबुक प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड इत्यादी कागदपत्रासह जवळील अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र येथे संपर्क साधावा. तसेच या कामी बूथ स्तरावर भाजप पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख सहकार्य करणार आहेत.

 
Top