धाराशिव (प्रतिनिधी)- प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून गडदेवदरीमध्ये झालेल्या रस्ता कामात भ्रष्टाचाराचा पाझर वाहून गेल्याचे दिसून येत आहे.अवघ्या 25 दिवसांमध्ये रस्त्यात खड्डे निर्माण झालेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ रस्त्याची पाहणी करून पंचनामा करावा अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार शीला उंबरे-पेंढारकर यांनी केली आहे.

यासंदर्भात माहिती अशी की, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून, या ठेकेदारामार्फत गडदेवदरी पाटी ते देवस्थान रस्ता ठेकेदारामार्फत एका रात्रीतून तयार करण्यात आला. या रस्ता कामासाठी अंदाजपत्रकानुसार आवश्यक असणारे साहित्य ठेकेदाराने वापरले नाही त्यामुळेच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत तर काही ठिकाणी रस्ताच उखडून पडलेला आहे.

गडदेवदरी येथील वाजेत मुजावर यांनी 4 जुलै रोजी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार देऊन वस्तुस्थिती मांडलेली आहे. सदर रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी मुजावर यांच्यासह ग्रामस्थांनी केले असता रस्ता कामात डांबराचा वापर न करता  काळे तेल पोतरा मारल्याचे दिसते आहे. अवघ्या अर्धा इंच पेक्षा कमी थराचा रस्ता, आहे की खड्ड्यात रस्ता तयार केलेला आहे. असा प्रश्न या भागातील नागरिकांना पडलेला आहे.

संबंधित रस्ता कामासाठी अंदाजे आठ कोटी रुपये खर्च झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे मात्र एक कोटी पेक्षा कमी रकमेत हा रस्ता तयार करून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराशी संगणमत करून भ्रष्टाचार केल्याचे उत्तम उदाहरण रस्त्याची पाहणी केल्यानंतर दिसते आहे. जिल्हा प्रशासनाने तात्काळ रस्त्याची पाहणी करून दोषींवर कारवाई करावी अन्यथा भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्यासाठी गड देवदरी ग्रामस्थांना सोबत घेऊन उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ पत्रकार शीला उंबरे-पेंढारकर यांनी दिला आहे.


 
Top