धाराशिव (प्रतिनिधी)- गुणवंत विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन स्वतः सोबत देशहितासाठी कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन विद्याभारतीचे शेषाद्री डांगे यांनी केले. ते धाराशिव येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर धाराशिवचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रदेश मंत्री वैभवी ढिवरे, शहराध्यक्ष प्रा. प्रशांत गुरव, शहर मंत्री अनिकेत कोळगे उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री डांगे पुढे म्हणाले की आजच्या तरुणांना नवीन शैक्षणिक धोरणामुळे कौशल्य तंत्रज्ञानासह भारतीय प्राचीन परंपरांचे शिक्षण घेण्याची संधी प्राप्त झाली असून यामुळे विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार शिक्षण मिळणार आहे. त्यातून स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करून आयुष्यात यशस्वी व्हावे. 

प्राध्यापक डॉ. प्रशांत दीक्षित यांनी नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून तयार केलेले असल्यामुळे त्यातून भारताची तरुण पिढी कौशल्य युक्त होऊन आत्मनिर्भर भारतासाठी तयार होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. अभाविप प्रदेश मंत्री वैभवी ढिवरे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक प्रशांत गुरव यांनी केले. या कार्यक्रमात धाराशिव शहरातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. आभार शहर मंत्री अनिकेत कोळगे यांनी मांडले. 

 
Top