धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी उपविभागांतर्गत असलेली सात वाहने अनाधिकृतपणे वापरण्यात येत आहेत. त्यामुळे संबंधित अधिकार्यांवर कारवाई करुन दंड आकारण्यात यावा, अशी मागणी सुराज्य निर्माण सेनेचे धाराशिव जिल्हा संघटक तथा कोळी महासंघाचे युवा जिल्हाध्यक्ष सचिन विजयकुमार सर्जे यांनी निवेदनाद्वारे उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत यांत्रिकी उपविभाग ग्रामीण पाणी पुरवठा यांच्यामार्फत शासकीय वाहनांची माहिती माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविली असता संबंधित विभागाकडून अपूर्ण माहिती देण्यात आली. सदरील वाहने ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांच्या नावे आहेत. यातील वाहने (क्र. एमएच 25-पी 4028, एमएच 25-पी 4029, एमएच 25-पी 4030, एमएच 25-पी 4031, एमएच 25-पी 4032, एमएच 25-पी 4033 व एमएच 25-बी 6580) या वाहनांचे सन 2017 पासून आजपर्यंत फिटनेस, पीयुसी व विमा नियमित करण्यात आलेला नाही. तरी देखील सदरील वाहने अनाधिकृतपणे यांत्रिकी उपविभागाने वापरलेली आहेत. त्यामुळे सदरील वाहने अनाधिकृतपणे वापरल्याप्रकरणी संबंधित अधिकार्यांवर कायदेशीर कारवाई करुन योग्य तो दंड आकारण्यात यावा, अशी मागणी श्री.सर्जे यांनी केली आहे.