वाशी (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्डी येथील शिक्षिका उर्मिला भोसले-कावळे यांच्याकडून प्रभावी अध्ययनासाठी शिक्षणाचे कृतीयुक्त धडे देत विद्यार्थ्यांना कृतियुक्त शिक्षण देण्याचा उपक्रम राबविला गेला.

वाशी तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा, पार्डी येथील शिक्षिका श्रीमती उर्मिला भोसले- कावळे यांनी मुलांना पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण, दिवस-रात्र कसे होतात हे समजावून देताना मुलांना प्रत्यक्ष मैदानात नेवून मुलांनाच सूर्य, पृथ्वी बनवून मैदानावरच त्यांच्या कक्षा आखून मुलांना स्वत:ला प्रत्यक्ष कृती करून त्यांना  प्रयत्नपूर्वक शिकते केले. यातून आपल्याला स्वत:चे स्वत:लाही शिकता येतं याचा विलक्षण आनंद मुलांना झाला. तसेच आपल्याला सर्वकांही शिकता येइलच हा शिक्षणाविषयीचा दृढ विश्वास उपस्थित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर व त्यांच्यात होत असलेल्या चर्चेतील आवाजात दिसून आला. 

सुरूवातीला दोन तीन मुले चुकली पण शेवटी स्वत: कृती केल्यामुळे ते स्वयंशिक्षित झाले. श्रीमती भोसले यांनी प्रात्यक्षिकासह सांगितले की, वर्गात स्वत:भोवती फिरता फिरता सूर्या भोवती कसं फिरायचं, सूर्य तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिरत फिरत डोंगराआड जातो. अशा एक ना अनेक शंका त्यांच्या मनात होत्या. त्या प्रत्यक्ष कृती केल्यावर निघूनही गेल्या. बालकांना कृतीयुक्त शिक्षण खूप आवडते व ते आनंददायी असल्यामुळे प्रभावी ठरते. परिसर अभ्यास, विज्ञान अशा विषयामधे अशा अनेक संकल्पना असतात की त्या कृतीयुक्त शिक्षणाने सहज स्पष्ट होतात. शासनाच्या नविन शैक्षणिक धोरणात कृतियुक्त शिक्षणाला महत्व देण्यात येत आहे. यामुळे पार्डी जिप शाळेत कावळे मॅडम यांनी राबवलेला कृतियुक्त शिक्षणाचा उपक्रम महत्व पूर्ण ठरतो.

 
Top