धाराशिव (प्रतिनिधी)-तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळ, पिकविमा यासंदर्भात जिल्हा व तालुका प्रशासनाने हलगर्जीपणा करुन अन्याय केल्याच्या प्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्धारे करण्यात आली आहे.

शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने प्रभारी विभागीय आयुक्त जगदीश मिणियार यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले की, तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळ, पीकविमा, यासंदर्भात झालेल्या अन्यायाविरोधात वेळोवेळी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना वारंवार निवेदने देऊनही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. त्याचबरोबर तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान, पीकविमा तसेच दुष्काळी उपाययोजनेमधून शेतकऱ्यांच्या विविध बॅकेच्या कर्जाची थकबाकी, कृषी पंपाच्या वीजबिलाची माफी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे, तुळजापूर तालुक्यासह परिसरातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ऊसबिले पंधरा दिवसांच्या आत द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनावर शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक दिलीप जोशी, अध्यक्ष सरदारसिंग ठाकूर, व्यंकट पाटील, पंडित पाटील, गुलाब शिंदे, अजमुद्दीन शेख, महादेव बिराजदार, बालाजी ठाकूर, महेश घोडके, श्रीकांत पोतदार, प्रताप ठाकूर, बंडू मोरे, दिलीप पाटील, काशीनाथ काळे, तोलू पाटील, महादेव गोरे यांच्यासह नळदुर्ग, शहापूर, वागदरी येथील शेतकऱ्यांची स्वाक्षरी आहे

 
Top