भूम (प्रतिनिधी)- प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या उपोषण आंदोलनाचे समर्थनार्थ भूम शहरातील जिजाऊ चौक ते गोलाई चौक पर्यंत सकल ओबीसीं बांधवांच्या वतीने मोटार सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी भूम यांना निवेदन सादर करण्यात आले. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ओबीसी आरक्षण संदर्भात मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे च्या मागणी मुळे ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले आहे असे नाहीतर दलित व आदिवासी यांचे देखील आरक्षण धोक्यात आले आहे. जात वैधता ठरवताना सगेसोयरे हा शब्द कसोट्यामध्ये समाविष्ट केल्यास सर्व उच्च जातींचा एस.सी, एस.टी व ओबीसी मागासवर्गीय आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा मार्ग मोकळा होईल व त्यामुळे आरक्षणास अर्थ राहणार नाही. जरांगे यांच्या मागणीप्रमाणे सरसकट सर्व मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिल्यास सुप्रीम कोर्टाचा अवमान होईल. घटनेच्या 15(4), 16(4) व 340 परिच्छेदानुसार मराठा समाजाला आरक्षण असंविधानिक आहे. तरीही महाराष्ट्र सरकारने निजाम कालीन खोट्या कुणबी नोंदी व सुग्रे आयोग यांच्या कार्यपद्धती शंकास्पद असल्याचे सिद्ध झाले आहे. उपोषण कर्ते प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या उपरोक्त मागण्या शासनाने त्वरित मान्य करून उपोषणाची सांगता करावी. उपोषण कर्त्यांची तब्येत बिकट होत असून त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याबाबत शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.

 
Top