धाराशिव (प्रतिनिधी)-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील महाराष्ट्र सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पात जनतेच्या कल्याणकारी योजनोचा समावेश करण्यात आलेला आहे. सर्वसामान्य नागरिक, महिला, विद्यार्थ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून भरघोस निधी आणि अर्थसाह्य देण्यात येणार आहे. परंतु विरोधकांकडून अर्थसंकल्पाबाबत जाणीपूर्वक अपप्रचार केला जात असल्याचे शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरज राजाभाऊ साळुंके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी (दि.30) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना उद्योग सेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शेरखाने, कमलाकर दाणे, मुागासवर्गीय सेलचे जिल्हाप्रमुख अमित बनसोडे, शहर संघटक रणजित चौधरी, रजनीकांत माळाळे यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना जिल्हाप्रमुख साळुंके म्हणाले की, राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत  21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा 1500 रुपये देण्यात येणार असून यासाठी 46 हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील 17 जिल्ह्यातील 10 हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी 80 कोटी तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफ देण्यात येणार आहेत. 52 लाख 412 लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानांतर्गत 7 लाख नवीन गटांची स्थापना करुन फिरत्या निधीच्या रकमेत 15 हजार रुपयांवरुन 30 हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना उमेद मार्ट आणि इ-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे आतापर्यंत 15 लाख महिलांना लखपती दीदी या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आलेेले आहे. 

मुलींना मोफत शिक्षण योजनेअंतर्गत चालू शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी, पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित 8 लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणशुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर राज्यातील नोंदणीकृत दिंड्यांसाठी प्रत्येकी 20 हजार रुपयांचा निधी निर्मल वारी योजनेअंतर्गत देण्यात येणार असून त्यासाठी 36 कोटी 71 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांकरिता मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेअंतर्गत राज्यातील 44 लाख 6 हजार शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाणार असून त्यासाठी 14 हजार 761 कोटी रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, महिला, युवती आणि विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने विविध कल्याणकारी योजनांची तरतूद अर्थसंकल्पात केलेली असताना विरोधकांकडून जाणीवपूर्वक अपप्रचार करण्यात येत असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख साळुंके यांनी सांगितले.


धाराशिव नगर परिषदेतील भ्रष्टाचार लवकरच उघडकीस आणणार

धाराशिव नगर परिषदेत प्रशासक आणि इतर अधिकाऱ्यांना हाताशी धरुन पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. शहरातील अंतर्गत रस्ते तसेच इतर विकासकामांमधील भ्रष्टाचार आपण लवकरच उघडकीस आणणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 
Top