ढोकी (प्रतिनिधी)- राष्ट्रीय आमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय कार्यशाळा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम  नवी दिल्ली येथे 26 जून रोजी  संपन्न झाला. या कार्यक्रमात तुगांव (ढोकी) ता. धाराशिवच्या पोलीस पाटील श्रुतिका हाजगुडे पाटील यांचा आयुष मेडिकल फौंडेशन आणि इंटिग्रॅटेड अचिव्हर्स अवॉर्ड 2024 यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

या दिमाखदार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून  फिलिपीन्सचे राजदूत एच.ई.बसेम एफ.हेल्लीस, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव (आयुष मंत्रालय भारत सरकार), रामदास आठवले (सामाजिक न्याय केंद्रीय राज्यमंत्री), ओमराजे निंबाळकर (खासदार धाराशिव), राजाभाऊ वाजे (खासदार नाशिक), डॉ. रोशन भड (AIIMS Delhi), डॉ. ओमप्रकाश शेटे (अध्यक्ष आयुषमान भारत महाराष्ट्र राज्य), प्रा. तनुजा नेसारी, डॉ.शरद मारोती पोरते आदी मान्यवर उपस्थित होते.

तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुष मेडिकल फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ.संदीप तांबारे यांनी केले. व्यसनमुक्ती साठी देशभरात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा या कार्यशाळेत मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांनी व्यसनमुक्तीची चळवळ समाजातील तळागाळातील सामान्य व्यक्ती पर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न होणे आणि नशामुक्त भारत अभियान यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या वेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या भाषणातून नशामुक्तीचा संदेश देत सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच धाराशिव लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यसनमुक्तीची सुरुवात ही स्वतःपासून करण्याचा संदेश राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रसंगातून दिला. तसेच धाराशिव तालुक्यातील तुगांव (ढोकी ) गावच्या पोलीस पाटील श्रुतिका हाजगुडे यांना या कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले हाजगुडे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले.  शेवटी उपस्थितांचे आभार इंटिग्रेटेड अचिव्हरच्या संस्थापिका जुही सभार्वल यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी देशभरातून व्यसनमुक्तीसाठी कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.


 
Top