धाराशिव (प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीला अपेक्षित यश मिळाले नाही. परंतु देशात स्पष्ट बहुमताचे सरकार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जनादेश देऊन एनडीए सरकार स्थापन करण्याची पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक समोर ठेवून जोमाने कामाला लागावे असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

धाराशिव येथे भारतीय जनता पार्टीची चिंतन बैठक रविवार, 23 जून रोजी माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी दानवे बोलत होते. बैठकीस भाजपा जिल्हाध्यक्ष संताजीराव चालुक्य पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, माजी आमदार गोविंद केंद्रे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री संजय केणेकर, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्ता कुलकर्णी, ॲड. व्यंकटराव गुंड, ॲड. अनिल काळे, प्रवीण पाठक, इंद्रजित देवकते, प्रदीप शिंदे, विकास कुलकर्णी व इतर पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत पदाधिकाऱ्यांना संबोधीत करताना दानवे म्हणाले की, महाराष्ट्राचा विचार केल्यास जनतेने कोणत्याही पक्षाला बहुमत दिलेले नाही. परंतु देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मित्रपक्षांसह स्पष्ट जनादेश देऊन बहुमताचे सरकार हाती दिलेले आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीत नव्या दमाने आणि ताकदीने आपल्याला जनतेसमोर जायचे आहे, पक्षाची भूमिका मांडायची आहे.


अजित पवार यांचा पक्षाला फटका नाही

मराठवाड्यात भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यासाठी अनेक कारणे आहेत. त्यामुळे अजित पवार महायुतीमध्ये आल्यामुळे भाजपला फटका बसला का? या प्रश्नाला उत्तर देताना भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पेपरमध्ये काहीही आले, तरी अजित पवार यांचा पक्षाला फटका बसला नाही असे स्पष्टपणे दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आपला हा दौरा मराठवाड्यात सर्व जिल्ह्यात आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्यामुळे नैराश्याचे वातावरण पसरले आहे. यातून बाहेर काढण्यासाठी नव्या जोमाने विधानसभा निवडणुकीत सामोरे जाण्यासाठी आपला हा दौरा आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना दानवे यांनी राजकारणात हार, जीत होत असते. अनेक धक्के सहन करून विरोधकांना मोठा धक्का द्यायचा असतो असेही दानवे यांनी सांगितले. 


 
Top