धाराशिव (प्रतिनिधी)- मला मिळालेला युवा साहित्य अकादमी पुरस्कार हा सर्वसामान्य माणसाच्या वेदनेला मिळालेला पुरस्कार आहे, असे मत तुळजापूर येथील युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक व कवी 'उसवण'कार देविदास सौदागर यांनी व्यक्त केले.

धाराशिव जिल्हा पत्रकार संघ आणि मराठवाडा साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कारप्राप्त आणि नामांकन मिळालेल्या लेखकांचा जाहीर सत्कार आणि 'मिट द प्रेस' कार्यक्रम शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उसवण या पुरस्कारप्राप्त कादंबरीचे लेखक व कवी देविदास सौदागर, पुरस्काराच्या अंतिम नामांकनात असलेल्या 'मऱ्हाटा पातशहा' या कादंबरीचे लेखक केतन पुरी आणि 'ऐहिकाच्या मृगजळात' या काव्यसंग्रहाच्या कवी पूजा भडांगे-लगदिवे या तीन युवा लेखकांचा सन्मान करण्यात आला.

पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जिल्ह्यातील तीन उमद्या लेखकांनी साहित्य क्षेत्रात धाराशिव जिल्ह्याचे नाव उंचावले आहे, त्यामुळे त्यांचे कौतुक व्हायला हवे, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. तिन्ही लेखकांची ओळख पत्रकार व कवी रवी केसकर यांनी करून दिली. मराठवाड्याने विशेषतः धाराशिव जिल्ह्याने साहित्य क्षेत्रात लौकिक कमावला असून या युवा युवा साहित्यिकांचा जाहीर नागरी सत्कार व्हायला हवा अशी अपेक्षा केसकर यांनी व्यक्त केली. यावेळी तिन्ही युवा साहित्यिकांचा सत्कार पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, मसापचे अध्यक्ष नितीन तावडे, ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ.अभय शहापुरकर,दिलीप पाठक नारीकर, कमलाकर कुलकर्णी, राजाभाऊ वैद्य,कवी राजेंद्र अत्रे, भा.न.शेळके यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी देविदास सौदागर यांनी मनोगत व्यक्त करताना हा पुरस्कार सर्वसामान्य माणसाच्या वेदनेला मिळाला असल्याचे सांगितले.२०१८ पासून मी लिहीत आहे. अगोदर कविता करायचो, परंतु काहीतरी दीर्घ लिहावं म्हणून ही कादंबरी लिहायला घेतली.कादंबरी वाचून लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया खूप जिवंत होत्या, असे सौदागर यांनी सांगितले. लेखक केतन पुरी यांनी मऱ्हाटा पातशहा पुस्तक लिहिण्याची पार्श्वभूमी सांगितली. अस्मितेच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज दाखवण्याचा माझा प्रयत्न होता, त्याला लोकांनी स्वीकारले याचा आनंद आहे,असे पुरी यावेळी म्हणाले.

कवयित्री पूजा भडांगे-लगदिवे यांनी सीमाभागातील बेळगाव येथील बालपणीच्या आठवणी सांगून कविता लेखनाची पार्श्वभूमी सांगितली. आयुष्याच्या एका टप्प्यावर कवितेने माझे बोट धरले आणि साहित्याचा प्रवास घडत गेल्याचे भडांगे-लगदिवे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार देविदास पाठक यांनी केले तर आभार पत्रकार संघाचे सरचिटणीस भीमाशंकर वाघमारे यांनी मानले.

यावेळी साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील धाराशिवकरांनी हा कौतुक सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाठक नारीकर, राजाभाऊ वैद्य, गणेश शिंदे, महेश पोतदार, संतोष हंबिरे, राकेश कुलकर्णी, जी.बी.राजपूत, औदुंबर पडवळ, प्रशांत कावरे शितलकुमार वाघमारे, राजेंद्रकुमार जाधव,सज्जन यादव, शुभम आगळे, आरिफ शेख, सतीश मातणे, अमजद सय्यद, राहुल कोरे, शेखर घोडके, कालिदास म्हेत्रे,बालाजी तांबे, अभिमान हंगरगेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 
Top