धाराशिव (प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसापासून धाराशिव जिल्ह्यात वादळी वारे व पावसाने थैमान घातले आहे. याचा जबर फटका वीज यंत्रणेला बसला असून, 2 हजार 45 विजेचे खांब कोसळले आहेत. परिणामी अनेक गावांना याचा फटका बसला होता. महावितरणची यंत्रणा त्वरीत कामाला लागल्यामुळे युद्धपातळीवर काम करून जवळपास 80 ते 85 टक्के खांब उभे करून तर काही ठिकाणी पर्यायी व्सवस्था करून वीजपुरवठा पुर्ववत करण्यात यश आले आहे. यामध्ये प्रामुख्याने गावठाण, पाणीपुरवठा, रूग्णालये व औद्योगिक वीजवाहिन्यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून वादळ वाऱ्यासह पाऊस थैमान घालत आहे. मोठ-मोठे वृक्ष वीज वाहिन्यांवर उन्मळून पडल्याने वीज यंत्रणा कोलमडत आहे. वादळी पावसाने महावितरणचे जवळपास दीड कोटी रूपयांचे नुकसान केले आहे. उच्चदाब वीज वाहिनीचे 660 तर लघूदाब वीजवाहिनीचे 1385 खांब कोसळले. तर 295 किलोमीटर लांबीच्या उच्चदाब व लघूदाब वीज वाहिनीच्या तारा तूटून पडल्या. त्याचबरोबर तब्बल 125 रोहित्रेही जमीनदोस्त झाली होती.

धाराशिव विभागांतर्गत येणाऱ्या भूम, परंडा, वाशी, कळंब व धाराशिव तालूक्यातील वीजयंत्रणेला सर्वाधिक फटका बसला आहे. या विभागात उच्चदाब वीजवाहिनीचे 446 खांब पडले होते. यापैकी 251 उभे केले आहेत तर लघूदाब वीज वाहिनीचे 900 खांब पडले होते. यापैकी 441 खांब उभे केले आहेत. त्याचबरोबर उच्चदाब वीज वाहिनीच्या  62.35 किलोमीटर लांबीच्या तारा तुटल्या होत्या. त्यापैकी 43.4 किमी लांबीच्या तारा पुर्ववत जोडल्या आहेत. तर लघूदाब वीज वाहिनीच्या  153.6 किलोमीटर लांबीच्या तारा तुटल्या होत्या. त्यापैकी 129.16 किमी लांबीच्या तारा पुर्ववत जोडल्या आहेत. धाराशिव विभागात रोहीत्रांनाही मोठा फटका बसला 52 रोहीत्रे जमीनदोस्त झाले. त्यापैकी 28 रोहीत्रे पुर्ववत उभे केली असून वीजपुरवठा पुर्ववत केला आहे.

तूळजापुर विभागांतर्गत येणाऱ्या उमरगा, लोहारा व तूळजापूर तालूक्यातील वीजयंत्रणेला मोठे नुकसान झाले आहे. या विभागात उच्चदाब वीज वाहिनीचे 214 खांब पडले होते यापैकी  131 उभे केले आहेत तर लघूदाब वीजवाहिनीचे 485 खांब पडले होते. यापैकी 246 खांब उभे केले आहेत. त्याचबरोबर उच्चदाब वीज वाहिनीच्या 18.82 किलोमीटर लांबीच्या तारा तुटल्या होत्या. त्यापैकी  14.33 किमी लांबीच्या तारा पुर्ववत जोडल्या आहेत. तर लघूदाब वीज वाहिनीच्या 59.26 किलोमीटर लांबीच्या तारा तुटल्या होत्या. त्यापैकी 39.72 किमी लांबीच्या तारा पुर्ववत जोडल्या आहेत. तर 73 रोहीत्रे जमीनदोस्त झाले. त्यापैकी 45 रोहीत्रे पुर्ववत उभे केली असून वीजपुरवठा पुर्ववत केला आहे.

महावितरण लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, धाराशिव मंडळाचे अधीक्षक अभियंता मकरंद आवळेकर, धाराशिव विभागाचे कार्यकारी अभियंता रोहीत जोगदंड, तूळजापूर विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश गूजर व संबंधित उपविभागांच्या उपकार्यकारी अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली विस्कळीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याकरिता महावितरणचे कर्मचारी व देखभाल दुरूस्तीकरणाऱ्या एजन्सीच्या कामगारांची पथके तयार केली आहेत.

 
Top