धाराशिव (प्रतिनिधी)- बारा बलुतेदार अठरापगड जातीच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी 9 ऑगस्टपासून राज्यभरात एल्गार यात्रा काढण्याचा निर्धार बारा बलुतेदार संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. पुणे येथे बारा बलुतेदार राज्य कार्यकारणीचे राज्याध्यक्ष कल्याण दळे  यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (दि. 25) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांनी जो अधिकार दिला, तो बारा बलुतेदारांना नाकारण्यात आलेला आहे. अनेकांनी बारा बलुतेदारांचा राजकीय वापर केला असल्याचा सूर राज्य कार्यकारणीच्या बैठकीत निघाला. रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी बारा बलुतेदार महासंघाने केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे. सदर प्रस्ताव सध्या राष्ट्रपती महोदय यांच्या कार्यालयात मंजुरीसाठी प्रस्तावित आहे. राज्यातील बारा बलुतेदार यांच्या जनजागृतीसाठी ऑगस्ट क्रांतीदिन 9 ऑगस्ट पासून संत गाडगेबाबा कर्मभूमी येथून बारा बलुतेदार अठरापगड जाती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने एल्गार यात्रा काढण्यात येणार आहे. 9 ऑगस्ट क्रांतीदिनी सुरू होणाऱ्या एल्गार यात्रेची सांगता 12 सप्टेंबर 2024 रोजी चैत्यभूमी मुंबई येथे होणार आहे. तसेच शिवाजी पार्क मुंबई येथे बारा बलुतेदार यांची जाहीर सभा घेण्यात येणार असल्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला.

सदरील बैठकीस बारा बलुतेदार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे, कार्याध्यक्ष सतीश दरेकर, प्रदेश उपाध्यक्ष धनंजय शिंगाडे, राज्य सचिव पांडुरंग कुंभार, उपाध्यक्ष प्रतापराव गुरव, सरचिटणीस चंद्रकांत गवळी, अशोकराव सोनवणे, विजय पोहनकर, सतीश कसबे, भगवान श्रीमंदीलकर, मुजावर यांच्यासह प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top