धाराशिव (प्रतिनिधी)- बालकाच्या मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 27 नुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नयेत असे स्पष्ट निर्देश असतानाही राज्य निवडणूक आयोगा मार्फत शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निवडणुकीच्या नावाखाली दीर्घ कालावधीसाठी प्रतिनियुक्तीवर घेऊन निवडणुक व बी.एल.ओ. ची कामे वर्षभर करून घेतली जात आहेत. त्यामुळे आर.टी.ई. ॲक्ट 2009 चा भंग होऊन विद्यार्थ्यांचे आतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे.

न्यायालयीन निर्देशानुसार शिक्षकांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेची 3/4 दिवसाचीच कामे देणे बंधनकारक आहे. त्यामुळे निवडणूक कामाच्या नावाखाली जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडून होणा-या शिक्षक व अधिकारी यांच्या दीर्घ कालीन प्रतिनियुक्ती कायमच्या बंद कराव्यात. असे निवेदन अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने राज्य निवडणूक आयुक्त यांना ईमेलव्दारे व  विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी,  मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. निवेदनावर अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर, राज्य कार्यकारणी सदस्य बशीर तांबोळी, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, जिल्हा सरचिटणीस अविनाश मोकाशे, जिल्हा चिटणीस महबूब काझी यांच्या स्वाक्षरी आहेत.

 
Top