धाराशिव (प्रतिनिधी) - महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील या मोठ्या मताधिक्याने निवडून येवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतील. त्यांच्या विजयासाठी सर्व रिपाइंचे कार्यकर्ते आणि दलित बांधवांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन  केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले.

धाराशिव येथे महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ, युवक जिल्हाध्यक्ष रवी माळाळे,  राज्य सचिव संजय बनसोडे, जिल्हा संपर्क प्रमुख विद्यानंद बनसोडे, शहराध्यक्ष उदय बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष  रणजित गायकवाड, जिल्हा सचिव तानाजी कदम प्रविण बनसोडे यांच्यासह रिपाइं व महायुतीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, भारताचे संविधान कोणीही बदलू शकत नाही आणि मोदींचे सरकार संविधान कधीही बदलणार नाही. मात्र काँग्रेस देशातील दलितांमध्ये संविधान बदलण्याचा संभ्रम पसरविण्यावर भर देत दलितांची मते मिळवू पाहात आहे. अशा काँग्रेसजणांना देशात राहण्याचा अधिकार उरला नाही. त्यामुळे काँग्रेस चले जाव, असा नारा देत महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना मोठे मताधिक्य देवून विजयी करण्यासाठी रिपाइंच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ यांनी केले. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही मतदारांनी घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या अधिकृत उमेदवार अर्चनाताई पाटील यांना आपले अमूल्य मत देवून विजयी करावे, असे आवाहन केले.


 
Top