धाराशिव (प्रतिनिधी)-कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या 21 टीएमसी पाणीप्रश्नावर विरोधी उमेदवार तथा विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मागील पाच वर्षात कोणती आणि कुठे कार्यवाही केली किंवा पाठपुरावा केला, याचा पुरावा त्यांनी जनतेसमोर मांडावा, असे आव्हान भाजपाचे लोकसभा निवडणूक प्रमुख नितीन काळे यांनी राजेनिंबाळकरांना दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना नितीन काळे म्हणाले की, जिल्ह्याच्या पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी 21 टीएमसी पाण्याचा कृष्णा मराठवाडा प्रकल्प पूर्णत्वास जात आहे. सार्वजनिक हिताच्या दृष्टिने महत्वाचा असलेला जिल्ह्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकरांनी काहीही केलेले नाही. उलट अडीच वर्षांच्या उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारने जलयुक्त शिवारसारखी लोककल्याणकारी योजना थांबवली. कोरोनाच्या काळात कधीही घराबाहेर न येणाऱ्या माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टिने कोरोना लसीच्या निर्मितीसाठी सुरू केलेले प्रकल्प आणि उपक्रमाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. जलयुक्तसारखी योजना बंद करून तत्कालीन ठाकरे सरकारने शेतकरीविरोधी असल्याचा पुरावाच दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या विद्यमान खासदाराला पुन्हा जनतेसमोर मत मागण्याचा नैतीक अधिकार नाही. तसेच त्यांनी खरेच पाणीप्रश्नावर कुठल्या कार्यालयाकडे पाठपुरावा केला असेल तर तो त्यांनी जनतेसमोर पुराव्यानिशी मांडावे, असे आव्हान काळे यांनी दिले.


 
Top