धाराशिव (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासन गोशाळा व गोसंगोपन या दोन्ही विषयांवर गोसेवा आयोगामार्फत विविध योजना राबवत असून गोशाळा संचालकांनी आपल्या संस्था नोंदणीकृत करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून गोसंवर्धन करावे, असे आवाहन महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी केले.

धाराशिव येथील अन्नपूर्णा बहुउद्देशीय संस्थेने जिल्ह्यातील गोसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांची जिल्हास्तरीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंदिर ट्रस्टचे श्यामसुंदर बांगड, अशोक मंत्री, माहेश्वरी जिल्हा सभेचे श्रीकिशन भन्साळी, मदनलाल मिनियार, जुगल लोया, राजस्थानी सेवा संघाचे अतुल अजमेरा, मनोज कोचेटा, जगदीश मोदाणी, महेश मिनियार, हनुमानदास भराडीया उपस्थित होते.

पुढे बोलताना मुंदडा म्हणाले की, गोसेवा आयोग जी-10 संकल्पना राबवत असून या 10 बिंदूमध्ये गोसंगोपन, गोसंवर्धन, गोसंरक्षण या व इतर विशिष्ट विषयांचा समावेश आहे. याचा सर्व गोशाळा संचालकांनी लाभ घेणे आवश्यक आहे. या संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या शेठ गोविंद खटोड भाकड गायींच्या गोशाळेला मुंदडा यांनी भेट देवून गोशाळेचे उत्कृष्ट प्रकारे गोसंवर्धन केल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष अतुल अजमेरा व इतर सदस्यांनी त्यांना याबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हा माहेश्वरी सभा, श्री बालाजी मंदिर ट्रस्ट व राजस्थानी सेवा संघ या संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक मदनलाल मिनियार यांनी तर आभार संजय मंत्री यांनी व्यक्त केले.


 
Top